
पिंपरखेड ( प्रतिनिधी ) दि. १९/९/२०२६ शनिवार रोजी विद्यालयात शासन निर्देशानुसार ‘माता-पालक शैक्षणिक मेळावा’ मुख्याध्यापक मा. काशिनाथ गवळी सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. माता पालक मेळाव्यामध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. विद्यार्थिनी व विद्यार्थी यांच्या अडीअडचणी त्यांची शैक्षणिक गुणवत्ता, सर्वांगीण विकास व सुरक्षा, सुरक्षीत व संतुलित पोषण आहार तसेच जंक फूड सेफ्टी अशा विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले.
प्रारंभी माता पालकांच्या हातून सरस्वती पूजन करण्यात आले. विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक संजय कांदळकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. मंचावर प्रमुख अतिथी म्हणून सखी सावित्री समितीच्या अध्यक्षा सोनाली सोनवणे उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. काशिनाथ गवळी यांनी २८ अॉगष्ट २६ रोजीच्या शासन परिपत्रकातील विविध मुद्दे वाचून दाखवले व माता पालकांना ते समजावून सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीमध्ये केवळ शिक्षकच नाही तर कुटुंबातील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे आई देखील महत्वाची भूमिका बजावत असते. म्हणूनच माता पालकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अडीअडचणींमध्ये त्यांच्या सोबत राहून त्यांना त्या अडीअडचणी सोडवण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच शिक्षकांसोबत चर्चा करून संवादाच्या माध्यमातून आपल्या पाल्याची सर्वांगीण प्रगती कशी साधता येईल याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे व गरजेनुसार मार्गदर्शन करणे आवश्यक असल्याचे मुख्याध्यापकांनी नमूद केले. अनेक वेळा विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना अनेक अडीअडचणी असतात , समस्या असतात आणि व्यक्त कोणाकडे व्हावे हे समजत नाही अशावेळी त्यांच्या समस्या समजून घेऊन त्याची मैत्रीण बनून त्याच्या भावभावना जाणून घेतल्या पाहिजेत व त्याच्या शैक्षणिक प्रगतीतील अडथळा दूर करण्यासाठी मित्र म्हणून त्याची मदत केली पाहिजे.
यावेळी विद्यार्थी सुरक्षेसाठी तक्रार पेटी, सूचना पेटी, विद्यार्थी हालचाल रजिस्टर,अभ्यागत रजिस्टर,सी.सी.टीव्ही. तसेच शुद्ध व सुरक्षीत पिण्याचे पाणी, संतुलित पोषण आहार,निपूण भारत,कला क्रीडा, विविध स्पर्धा परीक्षा व शैक्षणिक उत्कर्षासाठी राबवत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती मुख्याध्यापकांनी दिली.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संजय कांदळकर,कैलास पठाडे, लक्ष्मण जाधव, उत्तम सोनवणे, अमिता पारखे ,पुनम घाडगे,संदीप मवाळ, आबा सोनवणे यांनी सहकार्य केले,आभार उत्तम सोनवणे यांनी माणले.

