
नाशिक ( प्रतिनिधी ) सह्याद्री शिक्षण प्रसारक व समाज विकास मंडळ , नाशिक संचलित अमर बन्सीलाल छाजेड जागृती श्रवण विकास विद्यालय, मखमलाबाद , नाशिक
या शाळेत गणेशोत्सवाच्या निमित्तानं गणेश आरती सुप्रसिद्ध बालसाहित्यिक कवी राजेंद्र सोमवंशी यांच्या शुभहस्ते करण्यात आली.

समाजातील अनेक मुलांना बालवयात शारीरिक अडचणींचा सामना करावा लागतो.कर्णबधीर असणे म्हणजेच श्रवणबाध्य (९०,१००% )असणे होय.
समाजातील या मुलांच्या साठी श्रवण विकास विद्यालये काम करतात त्यापैकी एक म्हणजे मखमलाबाद येथील अमर बन्सीलाल छाजेड जागृती श्रवण विकास विद्यालय होय.
अत्यंत सुंदर इमारत , विद्यार्थ्यांना तेवढीच सुसज्ज व स्वच्छ अशा वर्गखोल्या , मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृहे, स्वतंत्र भोजन कक्ष, व्हिडिओ हॉल ,वैद्यकीय मदत कक्ष ,सुरक्षा व्यवस्था हे सर्व इतकं नेटकं आणि नेमकं होतं की बघितल्यानंतर एक शिक्षक म्हणून सहजच आतून आनंद व्हावा अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
शाळेतील निरागस व चेहऱ्यावर हसू फुललेल्या विद्यार्थ्यांची लगबग व एकमेकांशी खुणावत सुरू असलेल्या संवाद शैलीचा सहज वापर पाहिल्यावर मनाचे कान करून ऐकणाऱ्या नुकत्याच उमललेल्या सुंदर फुलांचा ताटवा म्हणजे ही शाळा आहे असेच म्हणावे लागेल…
संकुलातील या मुलांना दया नको संधी हवी आहे , सहानुभूती नको साथ हवी आहे,ही कर्णबधीर नाही तर जिद्द आणि चिकाटीची दुसरं नावं आहेत…..

गणेश आरती झाल्यानंतर श्री. बारी सर यांनी शाळेची माहिती दिली.प्रत्येक गोष्ट ही कशा पद्धतीने नेमकी सांभाळली जाते याबद्दलही त्यांनी व्यवस्थित माहिती सांगितली .एकूण ६७ विद्यार्थी व ६ शिक्षक २ मदतनीस व स्वयंपाकी असा जवळपास १६ कर्मचारी संख्या असलेली ही शाळा म्हणजे श्रवणबाध्य असलेल्या विद्यार्थ्यांसाठी आपलं माहेर घरच आहे असं जाणवल्याशिवाय राहत नाही. नासिक मध्ये मखमलाबाद परिसरात इतक्या सुंदर पद्धतीचं हे शालेय रोपट विश्वस्त मंडळांना इतक्या जिव्हाळ्याने जपलं आहे हे पाहिल्यानंतर खरोखरच समाजातील उपेक्षित घटकांची जाणीव असलेल्या दानशूर व्यक्तींनी अत्यंत मोठं काम उभं केलं आहे याची जाणीव होते हे सगळं पाहिल्यानंतर आपण किती खुजे आहोत हे सुद्धा जाणवल्याशिवाय राहत नाही समाजात असं आणि इतकं चांगलं बघताना आपली दृष्टी आणि विचार विकसित होतात हे मात्र नक्की …
या विद्यालयाचे कारभारी
संस्थेचे अध्यक्ष श्री.सतिष मिश्रीलाल लुंकड
उपाध्यक्ष श्री.प्रशांत अशोक मुथा , सेक्रेटरी श्री.कमलेश कांतीलाल कोठारी , सह सेक्रेटरी श्री.शरद पांडुरंग शिरोडे , कोषाध्यक्ष श्री .बाळासाहेब गिरी, विश्वस्त श्री.नवनाथ भटा पाटील, श्री.संदीप मिश्रीलाल लुंकड, श्री.राजेंद्र गोविंद देवरे, श्री.प्रविण रामचंद्र सुर्यवंशी यासह सर्व शिक्षक व कर्मचारी खरोखरच कौतुकास पात्र आहेत.
समाजात चांगली माणसं आहेत म्हणून उद्याची सकाळ प्रसन्न व प्रेरणादायी असेल असा आशावाद ठेवण्यास हरकत नाही…
मित्रहो…
आपल्या हातून चांगलं कार्य घडावे अशी मनापासून शुभेच्छा त्यांनी दिल्या.

