
नांदगाव (प्रतिनिधी): नांदगाव शहरासह तालुक्यातील अनेक भागांमध्ये आज समाधानकारक पावसाने हजेरी लावली. शहरात चांगला पाऊस झाल्याने रस्त्यांवर पाणी साचले, तर वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला.

तालुक्यातील तांदुळवाडी, बाणगाव, खिर्डी, भौरी, सोयगाव, दहेगाव आणि मोरझर परिसरातही पावसाने चांगली बरसात केली. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येण्याची शक्यता आहे. पिकांसाठी आवश्यक ओलावा निर्माण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
गेल्या काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा असताना आज झालेल्या पावसाने शेतीला मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागानेही पुढील काही दिवस जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तवली आहे.

