
‘नाशिक:(प्रतिनिधी)- निसर्गासह सर्वांचेच संगोपन करणारी आई सर्वच कलांची जननी असते. जेव्हा माणसांना भावनांचे पंख फुटतात, संवेदनांची पालवी फुटते; तेव्हा प्राण्याचं रूपांतर माणसात होतं. अशी आपल्या प्रत्येकाला घडविणारी ‘आई नावाची शाळा’ ही माणूस घडवणारी संस्कारशाळा आहे, असे भावोदगार अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे माजी संमेलनाध्यक्ष आणि ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे यांनी काढले.
कालिका मंदिर सभागृहात प्रथमेश प्रकाशन प्रकाशित आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ.प्रशांत आंबरे लिखित ‘आई नावाची शाळा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाध्यक्ष कालिका मंदिर संस्थानचे अध्यक्ष अण्णासाहेब पाटील, मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे, ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ.किशोर पवार, सावानाचे उपाध्यक्ष डॉ.सुनील कुटे, केआरएच सोहम हॉस्पिटलचे संचालक डॉ.अनिरुद्ध ढोकरे, डॉ.शाम पगार, कल्पना आंबरे, लेखक डॉ.प्रशांत आंबरे, प्रकाशक सुरेखा आंबरे आणि प्रथमेश आंबरे मंचावर उपस्थित होते.
श्री.कांबळे पुढे म्हणाले की, जगातील प्रत्येकाची पहिली शाळा आईच असते. आईची भाषा, प्रेम, नातं वैश्विक असतं. आईच्या शाळेत प्रत्येक लेकरू पास होत असतं. आई आपले जीवनानुभव लेकरांच्या ओंजळीत टाकत असते. प्रतिकूल परिस्थितीतही जगणं सुंदर कसं करायचं; याचा आदर्श वस्तुपाठ देणारी या पुस्तकातील आई आपल्याला माणूस म्हणून जगायला शिकवते, असेही ते म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात अण्णासाहेब पाटील यांनी आई प्रत्येकालाच प्रिय असते. आईसह ग्रामीण जीवनातील अनेक प्रसंग लेखकाने अतिशय प्रांजळपणे मांडलेले असल्याने हे पुस्तक म्हणजे मातेचे महन्मंगल स्तोत्रच आहे, असे सांगितले. ॲड.नितीन ठाकरे आणि डॉ.शाम पगार यांची समायोचित भाषणे झाली. लेखक डॉ.प्रशांत आंबरे यांनी आपल्या भाषणात मातेच्या आठवणींना उजाळा देत पुस्तकाची निर्मितीप्रक्रिया कथन केली. पल्लवी वाकचौरे, महेंद्र वाकचौरे, अर्जुन वेलजाळी, अशोक चव्हाणके यांचा सन्मान करण्यात आला. साहित्य क्षेत्रासह वैद्यकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते.
कालिका मंदिर संस्थानचे सचिव डॉ.प्रतापराव कोठावळे यांनी प्रास्ताविक केले. डॉ.तेजस्विनी कदम यांनी आभार मानले. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.

