
सिन्नर (प्रतिनिधी):
आपला भवताल शब्दात मांडणारी, मानवी भावभावनांना शब्दबद्ध करणारी कविता काळजाला भिडते असे प्रतिपादन येवला येथील विशाखा पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी लक्ष्मण बारहाते यांनी केले. साहित्य भारती, व मसापच्या सिन्नर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘काव्यगप्पा’ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्यभारतीचे अध्यक्ष वृक्षमित्र विष्णू वाघ होते.
धुंद पावसाळी वातावरण, दिवे गेलेले, काही काळासाठी मिळालेली उघडीप, मिणमिणत्या उजेडात कुंद हवेत बारहातेंच्या कवितांनी काव्यरसिकांना आपल्या काव्यधारेत चिंब भिजविले.

“कशी होती आई, मला कुठे ठावं बोलू येण्याआधी, तिचे दूर गाव मिळालेच नाही, धरायला बोट तिच्या कुशीतले, अमृताचे घोट”
‘पाच बिघे’ या आपल्या गाजलेल्या कविता संग्रहातील आईच्या मायेला पारख्या झालेल्या मुलाच्या भावनांना शब्द देणारी कविता उपस्थितांना हेलावून गेली.
नव्याने येऊ घातलेल्या ‘हिरण्यपर्ण’ या केवळ झाडांवरील कविता संग्रहातील काही कविता त्यांनी ऐकवल्या.
झाडाची उंची मोजता येते, खोली नाही.. झाड कवेत घेता येते सावली नाही..

झाडांची विविध रूपे, विविध प्रतिमा, प्रतीके आणि सशक्त आशयातून बारहाते यांच्या कवितेत येतात. मानवाची निसर्गाशी तुटत चाललेली नाळ या कवितांतून जोडण्याचा आपला प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
फळे या कवितेत ते म्हणाले
जी झाडे, आपली फळे स्वता:हून देतात (आंबा,चिकू,पेरु) त्यांना आयुष्यभर फळे येतच राहतात…. आणि जी झाडे आपली फळे लपवून ठेवतात (कांदा,गाजर,मुळा) ती मुळासहित उपटून काढली जातात..”
वाटणी, पहिली बोली, शब्द अशा अनेक हृदयस्पर्शी कविता सादर करीत त्यांची रसिकांना मंत्रमुग्ध केले.
कवी लक्ष्मण बारहाते यांचा यथोचित सत्कार यावेळी करण्यात आला. कार्यक्रमासाठी शिवव्याख्याते कवी प्रा. जावेद शेख, बाबासाहेब भोरकडे, देविदास थोरात,जालिंदर डावरे आदि साहित्यप्रेमी उपस्थित होते. प्रास्ताविक किरण भावसार यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. प्रभाकर चतुर यांनी केले तर आभार प्रा. राजाराम मुंगसे यांनी मानले.

