
सिन्नर( प्रतिनिधी), दि. ७ जुलै : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस.टी.) NCMC ( नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड ) कार्डाची योजनेची मुदत १ ऑगस्ट २०२६ रोजी संपणार असल्याने ती किमान ४ ते ६ महिने वाढविण्यात यावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते व प्रवासी महासंघाचे पदाधिकारी डॉ. श्यामसुंदर झळके यांनी राज्याचे परिवहन मंत्री मा. प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
डॉ. झळके यांनी म्हटले आहे की, राज्यातील अनेक प्रवाशांना अद्याप NCMC कार्ड मिळालेले नाही. त्यामुळे मुदतवाढ न दिल्यास महिला, विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक तसेच इतर पात्र प्रवासी शासनाच्या सवलतींपासून वंचित राहण्याची भीती आहे. प्रवाशांच्या सवलती अबाधित ठेवण्यासाठी आणि कोणत्याही पात्र प्रवाशावर अन्याय होऊ नये म्हणून NCMC कार्डाची मुदत तातडीने वाढविणे आवश्यक आहे.
तसेच NCMC कार्डाचे अधिकृत शुल्क ₹१९९ (₹२००) असताना काही बाह्य एजन्सीकडून ₹२५० शुल्क आकारले जात असल्याची बाबही त्यांनी निदर्शनास आणून दिली आहे. यापूर्वी एस.टी. आगारांमध्येही ₹२५० शुल्क आकारण्यात आले होते. आता शुल्क ₹२०० करण्यात आले असले तरी पूर्वी जादा शुल्क भरलेल्या प्रवाशांना अतिरिक्त रक्कम परत मिळालेली नाही ती परत मिळावी.
प्रमुख मागण्या पुढीलप्रमाणे आहेत :
- NCMC कार्डाची मुदत किमान ४ ते ६ महिने वाढविण्यात यावी.
- महिला, विद्यार्थी, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक व इतर पात्र प्रवाशांच्या सवलती अबाधित ठेवण्यात याव्यात.
- राज्यातील सर्व एस.टी. आगारे व अधिकृत एजन्सींमध्ये NCMC कार्डासाठी एकसमान ₹२०० शुल्क आकारण्यात यावे.
– पूर्वी ₹२५० शुल्क भरलेल्या प्रवाशांना अतिरिक्त रक्कम परत करण्यात यावी.

