नाशिक:-जीवनातील दुःखावर उपाय शोधून मात केली तरच खरे सुख मिळते. प्रत्येक दुःखावर मात करण्याची शक्ती दत्तप्रभू देतात, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक, निरूपणकार पद्माकर देशपांडे यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या 'पुस्तकावर बोलू काही' उपक्रमात २८०वे पुष्प गुंफताना ते 'श्री दत्त महात्म्य कथामृत' पुस्तकावर बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक सुहास टिपरे होते.
देशपांडे पुढे म्हणाले की, दत्त महात्म्य कथामृत हा ग्रंथ परमहंस परिव्रजकाचार्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराज यांनी लिहिला आहे. वासुदेवानंद सरस्वती यांनी गेल्या शतकात श्री दत्तपुराण या ग्रंथाची निर्मिती संस्कृतमध्ये केली. सर्वसामान्यांना दत्तभक्तीविषयी माहिती व्हावी म्हणून त्यांनी हा ग्रंथ मराठीत लिहिला. दत्तमहात्म्यामध्ये ५१ अध्यायांतून सांगितलेल्या कथांमधून जीवनातील समस्या आणि त्यावर मात करण्याचे उपाय सांगितले आहेत. आजच्या धकाधकीच्या जीवनात मोक्ष प्राप्तीसाठी उपायदेखील या ग्रंथात सुचविले आहेत. दत्तभक्त बापू स्वर्गे यांची प्रस्तावना असल्याचे सांगत पुस्तकातील काही कथांची माहितीदेखील त्यांनी दिली.
मुक्ता चिंधडे आणि सुनंदा पाटील यांना ग्रंथभेट देण्यात आली. प्राचार्य प्र.द.कुलकर्णी यांनी स्वागत केले. ॲड.मिलिंद चिंधडे यांनी आभार मानले. अलका दराडे यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या शुक्रवारी (१७) ज्येष्ठ साहित्यिक एकनाथ वाघ 'फिर्याद' या पुस्तकावर आय स्पीच गप्पा मारणार आहेत