
18 जुलै रोजी सरांच्या ” आत्मशोध “या कवितांच्या पुस्तकाचे प्रकाशन संध्याकाळी साडेपाच वाजता रोटरी हॉल गंजमाळ, नाशिक येथे होणार आहे. सर सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. त्यांनी पारंपरिक शिक्षण एम. ए. प्रथम श्रेणीत ते उत्तीर्ण झाले. जनसंपर्क पत्रकारिता पदवी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आणि यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची योग पदविका आणि एम. ए. योगशास्त्र प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.

शिक्षक संघटना तसेच मुख्याध्यापक संघटनेचे सर पदाधिकारी आहेत. सेवानिवृत्त नाशिक जिल्हा मुख्याध्यापक संघटनेत सहकार्यवाह तसेच रोटरी हेल्थ सोसायटीमध्ये जनसंपर्क संचालक म्हणून काम केले आहे. डिसेंबर 2022 मध्ये महाराष्ट्र योगा फाउंडेशनच्या वतीने झालेल्या योग महोत्सवाच्या शिक्षण योग संमेलनाचे सर अध्यक्ष झाले होते. ते स्वतः पन्नास वर्षांपासून योगाचा अभ्यास करतात. नाशिक मधील स्वर्गीय मणीभाई देसाई यांच्याकडून त्यांनी योगाचे धडे गिरवले. तीनशे पेक्षा जास्त व्याख्याने दिली. योग शिबिरांसाठी मार्गदर्शन केले.
सरांची “सुलभ योग अभ्यास”,”आरोग्यदायी योगासने”,योगासने करा व निरोगी रहा ” आणि” सुलभ योगाभ्यास “ही चार पुस्तके प्रसिद्ध झाली असून आताचे आत्मशोध हे कवितांचे पुस्तक हे अतिशय मोलाचे आहे कारण पुस्तकात सरांनी वेळोवेळी लिहिलेल्या कविता एकत्रित केल्या आहेत. सरांनी मासिके आणि वर्तमानपत्रातून वेळोवेळी प्रासंगिक लेखन, व्यक्तीचित्रणात्मक लेखन, पुस्तक परिचयात्मक लेखन केले आहे. सर उत्तम कवी देखील आहेत.
सरांनी योगाचे औपचारिक शिक्षण हनुमान व्यायाम शाळा अमरावती आणि निसर्गोपचार शिक्षण सत्यनारायण जयस्वाल पुणे येथे घेतले आहे. सर पुणे विद्यापीठाच्या बहि:शाल केंद्राचे व्याख्याते आहेत. सरांचा पंचवटी वाचनालय, प्रहार वृत्तसंस्था, शेकोटी साहित्य संमेलन, सार्वजनिक वाचनालय नाशिकतर्फे शिक्षक गौरव समारंभात सत्कार झाला आहे. या खेरीज सरांनी वेळोवेळी वर्तमानपत्रातून पत्रलेखनही केले आहे. मालेगावच्या एम.एस.जी
कॉलेजमध्ये सरांचे महाविद्यालयीन शिक्षण झाले.
सरांनी त्यांचे युट्युब चॅनेल ही चालवले होते. सरांना प्रवासाची आवड असून मास्को रशिया येथे आण्णाभाऊ साठे साहित्य परिषदेत सरांचा सहभाग होता. निवृत्तीनंतर सरांनी योग अभ्यासाला वाहून घेतले. व्यक्तिमत्व विकास आणि आरोग्यासाठी योगाला पर्याय नाही असे सर प्रतिपादन करतात कारण योग हे सोपे आणि खर्च नसलेले साधन आहे. योगाभ्यास हा केवळ योगासने नसून आस्था आणि ध्यानाचा विषय असल्याचे ते प्रतिपादन करतात. योगासने आणि व्यायाम यात मूलभूत फरक असलेले ते सांगतात.
लेखक दोन प्रकारचे असतात असे ते म्हणतात. एक साहित्य व प्रतिभेचा अविष्कार असलेला आणि दुसरा विषयाला धरून लिहिणारा. सरांना मोठ्या व्यक्तीबरोबर फोटो काढायला आवडते. त्याबद्दल ते म्हणतात की या गोष्टीमुळे स्पर्शित ऊर्जा मिळते. सर दुसऱ्याबद्दल चांगले लिहिणारे आणि कायम इच्छिणारे आहेत. समाजाला आपण काहीतरी देणे लागतो अशी धारणा असणाऱ्या व्यक्तींमध्ये सरांचा समावेश होतो.
सरांचे जशी योगासनावर पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत तशीच साहित्यातील इतर विषयांवरही प्रसिद्ध व्हावीत अशी सदिच्छा मी त्यांना मागच्या पुस्तकाच्या वेळेला दिली होती. ती या आत्मशोध पुस्तकाच्या निमित्ताने फलद्रूप होते आहे याचा मला भरपूर आनंद आहे
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या विद्यमान, त्यांच्या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. आपणही त्यात हजर राहून सामील होऊ या. अशा या बहुश्रुत असलेल्या योगाचार्य श्री अशोक पाटील यांना आमच्यातर्फे मनःपूर्वक आरोग्यदायी शुभेच्छा.——— मिलिंद मधुकर चिंधडे.

