
नाशिक: दि.१८ वार्ताहर
मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता विद्यालय रामेश्वर या विद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले. अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री ढेपले बी के होते. विद्यालयाचे जेष्ठ शिक्षक श्री पगार जी टी व श्री सावंत बी एस यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन मुख्याध्यापक श्री ढेपले बी के यांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविकात श्री सावंत यांनी अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य उलगडून सांगितले. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची संधी न मिळूनही आपल्या विलक्षण प्रतिभेच्या बळावर कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य आणि सामाजिक साहित्यनिर्मिती करून मराठी साहित्यात अमूल्य योगदान दिल्याचे सांगितले. समाजातील वंचित, कष्टकरी, शोषित आणि उपेक्षित घटकांच्या वेदना आपल्या साहित्याद्वारे प्रभावीपणे मांडत त्यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला. आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.अध्यक्षीय मनोगतातून मुख्याध्यापक श्री ढेपले बी के यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अण्णाभाऊ साठे यांचे योगदान, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे फक्कड माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची … यातून संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा इतिहास तसेच त्यांच्या मनातील भावना, वेदना समाज प्रबोधन आणि परिवर्तनवादी विचार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊंच्या संघर्षमय जीवनातून जिद्द, परिश्रम, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची मूल्ये आत्मसात करावीत असे आवाहन केले. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. सूत्रसंचालन श्री सावंत बी एस यांनी केले यांनी केले. आभार श्री पगार जी टी यांनी मानले.

