
लोहोणेर येथील मविप्रच्या जनता विद्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमापूजन करताना मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के, पर्यवेक्षक विलास निकम तसेच उपस्थित शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंद.(छाया : सुनिल एखंडे)
लोहोणेर : येथील मराठा विद्या प्रसारक समाजाच्या जनता विद्यालय, लोहोणेर येथे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के होते तर पर्यवेक्षक विलास निकम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकवृंद उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आली.प्रास्ताविकात सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी अण्णाभाऊ साठे यांचे जीवनकार्य उलगडून सांगितले. त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाची संधी न मिळूनही आपल्या विलक्षण प्रतिभेच्या बळावर कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य आणि सामाजिक साहित्यनिर्मिती करून मराठी साहित्यात अमूल्य योगदान दिल्याचे सांगितले.समाजातील वंचित, कष्टकरी, शोषित आणि उपेक्षित घटकांच्या वेदना आपल्या साहित्याद्वारे प्रभावीपणे मांडत त्यांनी सामाजिक समतेचा संदेश दिला. “पृथ्वी शेषाच्या मस्तकावर नसून कष्टकरी जनतेच्या तळहातावर तरलेली आहे,” हा त्यांचा विचार आजही प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले.
अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के यांनी अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य, समाजप्रबोधन आणि परिवर्तनवादी विचार विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. त्यांनी विद्यार्थ्यांनी अण्णाभाऊंच्या संघर्षमय जीवनातून जिद्द, परिश्रम, सामाजिक बांधिलकी आणि मानवतेची मूल्ये आत्मसात करावीत,असे आवाहन केले. साहित्य हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनिल एखंडे यांनी केले.

