
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३३३८ वा दिवस

प्रभावित करणारी, भारून टाकणारी भाषणे, चतुर युक्तिवादाने नटलेली व्याख्याने आपण काही कमी ऐकतो का? परंतु घरी गेल्यावर त्यांतले अक्षरही आपल्या लक्षात राहत नाही आणि दुसरे कोणीतरी अगदीच साधेपणाने बोललेले चारच शब्दही आपल्या अंतःकरणात खोलवर रुजून राहतात, आपला पाठपुरावा करतात. आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणतात. जी व्यक्ती आपल्या शब्दात आपले व सर्वस्व ओतून बोलत असते तिच्या शब्दांचा परिणाम होतो. परंतु तिचे व्यक्तीत्व तसेच प्रभावशाली असावे लागते. शब्दांचे वजन हे वक्ताच्या चारित्र्यावर आणि आचरणावर अवलंबून असते. ज्याच्या कृती आणि विचारांत अंतर नसते, त्याच्या बोलण्याला एक वेगळेच नैतिक बळ प्राप्त होत असते. सर्व प्रकारच्या शिक्षणात आदान-प्रदान होत असते. गुरु देत असतात, शिष्य घेत असतात. परंतु देणाऱ्याजवळ देण्यासारखे विपुल असले पाहिजे आणि घेणाऱ्याने ओंजळी भरभरून ते घेतले पाहिजे. वक्त्याचे उच्च चारित्र्य आणि श्रोत्याची ग्रहणशीलता, या दोन्ही गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत.
*स्वामी विवेकानंद...*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर आषाढ ३० शके १९४८
★ आषाढ शुध्द /शुक्ल ८
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ मंगळवार दि. २१ जुलै २०२६
★ १९१० स्वातंत्र्यसैनिक, गांधीवादी नेते, संत साहित्याचे अभ्यासक, महाराष्ट्र विधानसभेचे सभापती, रोजगार हमी योजनेचे जनक विठ्ठल सखाराम उर्फ वि. स. पागे यांचा जन्मदिन.
★ १९९१ भारताचे तत्कालीन अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांनी आर्थिक सुधारणांचा पाया रचणारा क्रांतिकारी अर्थसंकल्प संसदेत सादर केला.

