नाशिक:- शिव गोरक्षपीठ संस्थानचे प्राचार्य आणि योगाचार्य अशोक पाटील यांचे योगगुरू ज्येष्ठ योगतज्ज्ञ मणिभाई देसाई यांचे स्मरणार्थ देण्यात येणारे 'योगदूत पुरस्कार' एका विशेष सोहळ्यात प्रदान करण्यात आले.
गंजमाळ येथील रोटरी सभागृहात महामंडलेश्वर श्री १००८ शिवानंद महाराज, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगीरथ शिंदे, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, ज्येष्ठ विचारवंत सावळीराम तिदमे, प्रा.श्रीकांत सोनवणे, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार, संयोजक योगाचार्य अशोक पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्य योगा फाउंडेशनचे जनसंपर्क अधिकारी आणि धुळे-२०२६ योग महोत्सव नियोजन समितीचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, वयाच्या ७७व्या वर्षी योग प्रचाराचे कार्य करणारे योग विद्या धामचे अध्यक्ष योगाचार्य मनोहर कानडे, महाराष्ट्र राज्य योग शिक्षक संघाचे सचिव आणि आयुर्वेद, योग, निसर्गोपचार तज्ज्ञ डॉ.योगेश कुलकर्णी, आशीर्वाद योग नॅचरोपॅथी संस्थेमार्फत योग प्रशिक्षण, आरोग्य जनजागृतीचे कार्य सातत्याने करणाऱ्या योगाचार्या राधिका धिवरे, योग-निसर्गोपचार तज्ज्ञ आणि माता-भगिनींना मार्गदर्शन करणाऱ्या 'मेनोपॉज' या मराठी आणि ब्रेल लिपीतील पुस्तकाच्या लेखिका प्रा.वंदना रकिबे, नाशिक शहर पोलीस आयुक्त कार्यालयात बिनतारी संदेश यंत्रणा विभागात सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकपदी कार्यरत असलेल्या अश्विनी पाटील यांना हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. पुरस्कारार्थींचे कुटुंबीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पुरस्कारार्थींचा परिचय रवींद्र मालुंजकर यांनी करून दिला. त्र्यंबकराव पाटील, विशाखा पाटील, डॉ.मनोज पाटील, योगेश पाटील यांनी स्वागत केले.