
लासलगाव ( प्रतिनिधी )महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाकडील परिपत्रक दिनांक १५/०७/२०२२ अन्वये, आज दिनांक २२ जुलै २०२६ रोजी लासलगाव येथील नूतन विद्या प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने स्व. अजित अनंतराव पवार यांची जयंती उत्साहात आणि आदरपूर्वक साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस उच्च माध्यमिक विभागाचे पर्यवेक्षक प्रा.उज्वल शेलार, प्रा.किशोर गोसावी, रा.से.यो कार्यक्रमाधिकारी प्रा.सुनिल गायकर, प्रा.देवेंद्र भांडे व उपस्थित सर्व प्राध्यापक यांचे हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. महाविद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांनी त्यांच्या स्मृतीस आदरांजली वाहिली.
स्व. अजित दादांनी आपल्या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीत प्रशासनावरील प्रभावी पकड, विकासाभिमुख निर्णयक्षमता आणि लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी कार्यपद्धती यामुळे जनतेच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले. पायाभूत सुविधांचा विकास, ग्रामीण आणि शहरी भागातील विकासकामांना दिलेली गती तसेच विविध लोककल्याणकारी योजना तळागाळातील नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी त्यांनी सातत्याने केलेले प्रयत्न आजही स्मरणात आहेत. त्यामुळेच जनतेने त्यांना प्रेमाने आणि विश्वासाने “दादा” ही ओळख दिली.
स्व. अजित दादांनी महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी दिलेल्या अतुलनीय योगदानाला वाहिलेली ही आदरांजली आहे. याप्रसंगी उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

