नाशिकरोड:( प्रतिनिधी)- नोकरी करणारी प्रत्येक व्यक्ती त्याच्या-त्याच्या पदाप्रमाणे काम करत असते. कोणतंही काम श्रेष्ठ किंवा कनिष्ठ नसून कामाचा दर्जा हा आपल्या प्रामाणिकपणे काम करण्यावर अवलंबून असतो... हा विचार मांडणाऱ्या प्रसिद्ध साहित्यिक अरविंद जगताप यांच्या इयत्ता दहावीच्या मराठी पाठ्यपुस्तकात असलेल्या 'आप्पांचे पत्र' या पाठातील जाणिवा विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष अनुभवल्या.
पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयात या पाठाच्या अध्यापनाच्या निमित्ताने विषयशिक्षक रवींद्र मालुंजकर यांनी विद्यालयाचे मुख्याध्यापक अरुण पगार आणि शिक्षक-कर्मचारी, विद्यार्थी यांच्या हस्ते शाळेतील कर्मचारी अभय टिल्लू, सुरेश सानप, चंद्रभान धनवटे, संजय कांगणे यांचा सन्मानचिन्ह आणि भेटवस्तू देऊन सत्कार करत कृतज्ञता व्यक्त केली.
सत्काराला उत्तर देताना भावनिक झालेल्या या कर्मचाऱ्यांनी आमच्या आयुष्यात झालेल्या या पहिल्या आणि आगळ्यावेगळ्या सन्मानाने आम्ही भारावून गेलो असून आमच्या कामाची जाणीव ठेवल्याबद्दल संयोजकांचे ऋण व्यक्त केले. मुख्याध्यापक अरुण पगार यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले की, कठोर परिश्रमाशिवाय पर्याय नाही. तुम्हीही भविष्यात कोणतीही पदवी मिळवा पण प्रामाणिकपणे काम करा. शाळेतील कर्मचाऱ्यांचा सत्कार निश्चितच प्रेरणादायी असल्याचे मत त्यांनी मांडले. कार्यक्रमाचा समारोप फळांचा केक कापून करण्यात आला. सत्कारार्थी कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप केले.