
बाणगाव ( प्रतिनिधी) वारकरी वेषातील लहान मुले ,पालखी मिरवणूक व विठू नामाचा गजर करत माझे गाव बाणगाव येथील जि. प. प्राथमिक शाळेत आषाढी एकादशी निमीत्त दिंडी सोहळा भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. हातात भगवे झेंडे , डोक्यावर तुळशी वृंदावन बघून जणू खरचं पंढरपूरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.लहान मुलं पांढरा झब्बा ,डोक्यावर टोपी ,कपाळी बुक्का ,गळ्यात तुळशी माळा , टाळ आणि नऊ वारीत आलेल्या लहान मुली , केसात गजरा , डोक्यावर तुळसी वृंदावन आणि विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली याअभंगाप्रमाणे विठ्ठल रुखमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी शाळेत अवतरले.या वेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या नामाचा गजर करत बाल वारकऱ्यांनी अभंगाचे गायन करत फुगड्या खेळण्याचा आनंद घेतला.अन अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्ती रसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. या दिंडी सोहळ्याचे शालेय समिती अध्यक्ष संदीप कवडे,प्रभाकर कवडे, रमेश कवडे, बाळासाहेब पाटील, प्रमोद घोडके यांच्यासह ग्रामस्थांनी स्वागत केले. श्री बाणेश्वर मंदिर सभागृहात ह. भ. प. प्रभू महाराज यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महात्मे सांगितले.

या उपक्रमामुळे विध्यार्थ्यांना वारकरी परंपरा ,सांस्कृतिक मूल्य आणि सामाजिक ऐक्याचा संदेश मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी मुख्याध्यापक संजय शेवाळे , अरुणा सुरसे ,संतोष मेढे ,प्रकाश फणसे , बाबूलाल ठोमरे , सुशीला कवडे ,मनीषा जाधव ,कविता कवडे यांनी विशेष परिश्रम घेतले.


