
वडांगळी येथे गुरुपौर्णिमा निमित्त निघालेली प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांची रथयात्रा
(छायाचित्र..श्यामसुंदर झळके )सिन्नर (प्रतिनिधी)
जीवनात अनेक संकटे येतात त्यातून मार्ग काढून जीवन समृध्द करण्यासाठी सद्गुरुंचे मार्गदर्शन आवश्यक असते.ते अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा मार्ग दाखवतात असे प्रतिपादन श्री वडांगळीकर स्वामी मठ ट्रस्टचे मठाधिपती प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांनी केले. वडांगळी येथे झालेल्या गुरुपौर्णिमा उत्साहात आशीर्वचन देताना ते बोलत होते.

यावेळी वडांगळीकर स्वामी मठातर्फे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. लेखा नगर, नाशिक येथील लाईफ केअर हॉस्पिटल तर्फे महाआरोग्य निदान व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले.यावेळी सुमारे 200 रुग्णांची तपासणी करून मार्गदर्शन करण्यात आले. तसेच गुरु दीक्षा कार्यक्रमात सुमारे 150 जणांनी गुरुदीक्षा घेतली.वडांगळी येथील मठापासून श्रीगुरु गंगाधर शिवाचार्य महाराजांच्या पालखीची तसेच भव्य रथातून प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज वडांगळीकर महाराजांची सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. यावेळी वीरशैव लिंगायत समाजातील गुणगौरव सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना महाराजांच्या हस्ते भेटवस्तू व प्रशस्तीपत्र देण्यात आले.त्यानंतर महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी नाशिक,धुळे,संभाजीनगर,
जळगाव,अहिल्यानगर जिल्ह्यातील विविध भागातून आलेल्या भाविकांनी श्री गुरु गंगाधर शिवाचार्य स्वामींच्या संजीवन समाधीच्या दर्शनासाठी गर्दी केली तसेच प्रभू पंडिताराध्य शिवाचार्य महाराज यांचे आशीर्वाद घेतले.

