
नांदगाव (प्रतिनिधी):
हिसवळ बु. (जि. नाशिक) येथील शेताच्या पारंपरिक वहिवाट रस्त्याच्या न्यायासाठी दिनांक ३ ऑगस्ट २०२६ पासून थेट नांदगाव तहसीलदारांच्या दालनातच उपोषणाला बसलेल्या वृद्ध तुळसाबाई देवचंद बेंडके व देवचंद नागू बेंडके या दाम्पत्याचे उपोषण अखेर आज दुसऱ्या दिवशी सायंकाळी मागे घेण्यात आले. पोलिस निरीक्षक सोळसे साहेब यांनी मध्यस्थी करत या उपोषणकर्त्या दाम्पत्याची समजूत काढली व त्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचवले.

प्रकरणाची पार्श्वभूमी व प्रत्यक्ष पाहणी:
सदर प्रकरण मामलेदार न्यायालय अधिनियम, १९०६ अंतर्गत (केस क्र. २५/२०२२) प्रलंबित आहे. उपजिल्हाधिकारी (भूमिसंपादन) येवला यांच्या आदेशानुसार दि. ०२ जून २०२६ रोजी प्रशासनाने जागेवर प्रत्यक्ष स्थळ पाहणी व पंचनामा केला होता, ज्यामध्ये पारंपरिक गाडी वहिवाटीचे पुरावे आढळून आल्याचा दावा उपोषणकर्त्यांनी केला आहे.
लष्करातील जवानाच्या आई-वडिलांचा लढा:
उपोषणकर्ते बेंडके दाम्पत्याचा मुलगा भारतीय सैन्यात देशाच्या सीमेवर कर्तव्य बजावत आहे. आपल्या हक्काच्या शेतरस्त्यासाठी जवान मुलाच्या वृद्ध आई-वडिलांना शासकीय कार्यालयात रात्रीचा मुक्काम ठोकून उपोषण करावे लागल्याने संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात होती.
तहसीलदारांची भूमिका आणि सद्यःस्थिती:
दरम्यान, या प्रकरणावर बोलताना तहसीलदारांनी सांगितले की, “मी निर्णय अजून कोणाच्याही बाजूने दिलेला नाही, म्हणजेच दोन्ही बाजूंचा अंतिम निर्णय प्रलंबित आहे.” तहसीलदारांच्या या भूमिकेमुळे आणि प्रशासकीय टाळाटाळीमुळे रस्त्याचा प्रश्न अजूनही अधांतरीच राहिला आहे. पोलिस प्रशासनाने तात्पुरती मध्यस्थी करून उपोषण सोडवले असले, तरी बेंडके दाम्पत्याला प्रत्यक्ष न्याय कधी मिळणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

