राजेंद्र तळेकर संपादक साप्ताहिक शेतकरी टाइम्स

ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, समाजसेवक, माजी राज्यपाल आणि डी. वाय. पाटील शिक्षण समूहाचे संस्थापक डॉ. ज्ञानदेव यशवंतराव (डी. वाय.) पाटील यांच्या निधनाची बातमी मनाला चटका लावून गेली. शिक्षण क्षेत्रातील एक युगपुरुष काळाच्या पडद्याआड गेला. त्यांच्या जाण्याने माझ्या मनात जपून ठेवलेल्या अनेक आठवणी पुन्हा जाग्या झाल्या.

सन २०१८ च्या साप्ताहिक शेतकरी टाइम्स दिवाळी अंकाच्या प्रकाशनाचा प्रसंग आजही डोळ्यांसमोर उभा राहतो. त्या वर्षी दिवाळी अंकाच्या मुखपृष्ठावर नांदगाव तालुक्यातील नस्तनपूर येथील शनिपीठ मंदिराचे छायाचित्र प्रसिद्ध करण्यात आले होते. अंकाचे प्रकाशन कोणाच्या हस्ते करावे, याचे नियोजन सुरू असतानाच जून २०१८ मध्ये माझ्या वाढदिवसानिमित्त डॉ. डी. वाय. पाटील यांचा शुभेच्छा संदेश आला. त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून दिवाळी अंकाच्या प्रकाशनाची विनंती केली. त्यांनी कोणताही आढेवेढा न घेता प्रेमाने होकार दिला आणि पुणे तसेच नंतर मुंबई येथे भेटीसाठी वेळ निश्चित करून दिली.

ठरलेल्या दिवशी आम्ही मनमाडहून पहाटेच्या पंचवटी एक्सप्रेसने मुंबई गाठली. सी-लिंकजवळील त्यांच्या निवासस्थानी पोहोचल्यानंतर त्यांचे पी. ए. कलीम यांनी आमचे आत्मीयतेने स्वागत केले. साहेबांचा शाल देऊन सत्कार केल्यानंतर त्यांच्या हस्ते साप्ताहिक शेतकरी टाइम्सच्या दिवाळी अंकाचे प्रकाशन झाले. त्या वेळी माजी सरपंच विठ्ठल आहेर, प्रकाश लहिरे, भूषण तळेकर आणि मी, राजेंद्र तळेकर उपस्थित होतो.
सुमारे अडीच ते तीन तास साहेबांसोबत विविध विषयांवर मनमोकळ्या गप्पा मारण्याचा योग आला. कोल्हापूरच्या मातीतल्या कुस्तीच्या प्रवासापासून राज्यपालपदापर्यंतच्या त्यांच्या जीवनप्रवासातील अनेक आठवणी त्यांनी आमच्यासोबत शेअर केल्या. इतक्या मोठ्या व्यक्तीने दिलेला स्नेह, साधेपणा आणि आत्मीयतेने केलेले स्वागत आजही मनाला स्पर्शून जाते.
या भेटीत आम्ही त्यांना नस्तनपूर येथे भेट देण्याचे निमंत्रणही दिले होते. त्यांनी ते आनंदाने स्वीकारले; मात्र पुढे कोरोनाच्या संकटामुळे तो दौरा होऊ शकला नाही. ही खंत आजही मनात कायम आहे.
आज साहेब आपल्यात नाहीत, पण त्यांच्या सहवासातील त्या आठवणी कायम हृदयाच्या कप्प्यात जिवंत राहतील. साप्ताहिक शेतकरी टाइम्स परिवारातर्फे डॉ. डी. वाय. पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या परिवाराला हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
[राजेंद्र तळेकर संपादक साप्ताहिक शेतकरी टाइम्स]

