
नाशिक:-( प्रतिनिधी )माणसाच्या जीवनशैलीचे मनन आणि चिंतन म्हणजे ‘जाणता हृदय हे’ हा सुंदर जगण्याचा मार्गदर्शक दस्तऐवज आहे. समाज हा कुटुंबाचा, राष्ट्राचा भाग असल्याने हृदयाची काळजी घेणे हे आपल्या हातात आहे, असा सूर ज्येष्ठ हृदयरोगतज्ज्ञ डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या पुस्तकाच्या संवादात्मक अभिवाचनातून निघाला.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात २९१वे पुष्प डॉ.अनिरुद्ध धर्माधिकारी यांच्या ‘जाणता हृदय हे’ या बहुचर्चित पुस्तकावर गुंफले गेले. डॉ.धर्माधिकारी एका महत्त्वाच्या शस्त्रक्रियेत व्यस्त असल्याने त्यांच्या अनुपस्थितीत मान्यवरांनी या पुस्तकातील महत्त्वपूर्ण भागाचे अभिवाचन केले. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य प्र.द.कुलकर्णी होते.

योगाचार्य अशोक पाटील, माजी आमदार नानासाहेब बोरस्ते, ज्येष्ठ समीक्षक प्रा.सुनील हिंगणे, समाजसेवक मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, सुप्रसिद्ध गझलकार तुकाराम ढिकले, ज्येष्ठ विचारवंत सावळीराम तिदमे, ज्येष्ठ साहित्यिका अलका दराडे, प्रा.गोकुळ आहिरे आदींनी अभिवाचन करताना पुस्तकातील महत्त्वपूर्ण बाबींवर प्रकाश टाकला. याद्वारे हृदयविकाराच्या झटक्याची तीव्रता आणि त्यामुळे निर्माण होणारी गुंतागुंत ही जाणून घेतली पाहिजे. कोणत्याही प्रकारचे वितृष्ट डॉक्टर, रुग्ण आणि नातेवाईक यांच्यामध्ये होऊ नये. त्यासाठी संवाद शैली महत्त्वाची आहे. माहितीपूर्वक सुसंवाद झाला तर अधिकपणे डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातील संवेदना जपल्या जातील. हृदयामुळे आपल्याला चेतनेची अनुभूती होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या हृदयाची काळजी घेणे गरजेचे आहे. हृदयाचे विकार, शरीर म्हणजे काय, रक्तदाब, व्यसनाधीनता, स्थूलपणा, आणि बायपास सर्जरी, स्त्रियांमधील होणारे हृदयविकार, आहार-विहार, तणावाची पाळेमुळे, योग आणि हृदयविकार, हृदयविकाराचा भस्मासुर, फुफ्फुसातील धमण्यांचा उच्च रक्तदाब, बहुरूपी कोरोना, कोरोना व हृदयविकार अशा विविध विषयांवर रसिकांना माहिती मिळाली. रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. तर दत्तात्रय कोठावदे यांनी आभार मानले.

