
नाशिक–पुणे सरळ सेमी हायस्पीड रेल्वे मार्गासाठी हजारोंचा एल्गार; उत्तर महाराष्ट्राच्या हक्कासाठी आरपारची लढाईसिन्नर, दि. ५ ऑगस्ट : आज सकाळी १० वाजता सिन्नर येथे सिन्नर तालुका रेल्वे कृती समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. बैठकीत क्रांतीदिन, दि. ९ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता गोंदे फाटा येथे वर समृद्धी महामार्ग आणि खाली नाशिक–पुणे महामार्गावर एकाचवेळी भव्य रस्ता रोको व चक्काजाम आंदोलन करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. या आंदोलनात सिन्नर तालुक्यासह संगमनेर, अकोले आणि उत्तर महाराष्ट्रातील हजारो नागरिक सहभागी होणार असून हा जनआक्रोश सरकारला जाग आणणारा ठरेल, असा निर्धार बैठकीत व्यक्त करण्यात आला.बैठकीत सांगण्यात आले की, खासदार राजाभाऊ वाजे यांच्या सूचनेनुसार सिन्नर शहरातील सर्व नगरसेवक, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समिती सदस्य तसेच विविध गावांतील पदाधिकाऱ्यांनी वॉर्डनिहाय व गटनिहाय बैठका सुरू केल्या आहेत. त्याचप्रमाणे भाजप नेते उदयभाऊ सांगळे यांनीही प्रत्येक गाव, गट व वॉर्डमध्ये बैठका घेऊन रेल्वे मार्गाबाबत जनजागृती करण्याचे निर्देश आपल्या कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण सिन्नर तालुक्यात गावागावांत जनजागृती मोहीम वेगाने सुरू झाली असून कृती समितीही गावनिहाय बैठका घेऊन नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन करणार आहे.समितीने आरोप केला की, नाशिक–पुणे सरळ सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग ही उत्तर महाराष्ट्रातील जनतेची गेल्या सुमारे ४० वर्षांपासूनची न्याय्य आणि सातत्यपूर्ण मागणी आहे. या मार्गासाठी अनेक वेळा सर्वेक्षणे करण्यात आली असून सिन्नर तालुक्यासह विविध भागांमध्ये भूसंपादनाची प्रक्रिया देखील पूर्ण करण्यात आली आहे. सर्वेक्षण, आराखडे आणि भूसंपादनावर शासनाने कोट्यवधी रुपयांचा सार्वजनिक निधी खर्च केला आहे. आता हा प्रकल्प बाजूला ठेवून जनतेकडून कोणतीही मागणी नसलेला नाशिक–शिर्डी–पुणतांबा–अहिल्यानगर–पुणे हा नवीन रेल्वे मार्ग पुढे आणण्यात येत असल्याने आतापर्यंत झालेला सर्व खर्च वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.समितीने गंभीर आरोप केला की, नगर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे, श्रेयवाद आणि अंतर्गत राजकारणाचा फटका नाशिक–पुणे सरळ रेल्वे प्रकल्पाला बसला आहे. जनतेच्या चार दशकांच्या संघर्षाकडे दुर्लक्ष करून कोणतीही लोकमागणी नसलेला वळणाचा मार्ग पुढे रेटण्यात येत आहे. हा निर्णय उत्तर महाराष्ट्रातील जनतेवर अन्याय करणारा असून लाखो नागरिकांच्या भावनांशी प्रतारणा करणारा आहे.समितीच्या मते, वळणाच्या मार्गामुळे रेल्वेचे अंतर सुमारे ६० ते ७० किलोमीटरने वाढणार असून प्रवासाचा वेळ, इंधन खर्च आणि संचालन खर्च वाढणार आहे. हजारो विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी, शेतकरी आणि उद्योजकांचे आर्थिक नुकसान होणार आहे. सिन्नर एमआयडीसी, संगमनेर औद्योगिक क्षेत्र, कृषी प्रक्रिया उद्योग, द्राक्ष व वाइन उद्योग, कृषी निर्यात तसेच पुणे–नाशिक औद्योगिक कॉरिडॉरच्या विकासालाही मोठा फटका बसणार आहे.त्यामुळे कृती समितीने पुढील मागण्या केल्या आहेत –* नाशिक–सिन्नर–संगमनेर–अकोले–नारायणगाव–आळेफाटा–मंचर–खेड–चाकण–पुणे या सरळ सेमी हायस्पीड रेल्वे मार्गास तात्काळ मंजुरी देण्यात यावी.* नाशिक–शिर्डी–पुणतांबा–अहिल्यानगर–पुणे हा वळणाचा प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा.* रेल्वे मंत्रालयाने लोकप्रतिनिधी, उद्योग संघटना, रेल्वे तज्ज्ञ आणि रेल्वे कृती समिती यांची तातडीने संयुक्त बैठक बोलवावी.सरकारने जनतेच्या भावनांचा आदर करून तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास ९ ऑगस्टचा क्रांतीदिन हा उत्तर महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात मोठ्या जनआंदोलनाचा साक्षीदार ठरेल. गोंदे फाटा येथे वर समृद्धी महामार्ग आणि खाली नाशिक–पुणे महामार्गावर एकाचवेळी होणारा चक्काजाम हा उत्तर महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचा एल्गार असेल, असा इशारा समितीने दिला.तरी सिन्नर, संगमनेर, अकोले तालुक्यातील नागरिकांनी मोठयासंख्येने सहभागी व्हावे आवाहन कृती समितीच्या वतीने करण्यात आले.बैठकीस उदयभाऊ सांगळे, हरिभाऊ तांबे, प्रा. राजाराम मुंगसे, दत्ता वायचळे, जयराम गीते, कृष्णा पोटे, राजाराम मुरकुटे, दीपक सोनवणे, सजन सांगळे, संकल्प भालेराव, पप्पू गोडसे, निखिल भेंडाळे, संदीप उगले, शामसुंदर झळके, संजय सोनवणे तसेच इतर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.”४० वर्षांच्या संघर्षाला न्याय द्या – सरळ रेल्वे मार्ग मंजूर करा!””रेल्वे आमचा हक्क आहे – तो मिळविल्याशिवाय शांत बसणार नाही!””९ ऑगस्टला गोंदे फाटा बंद – उत्तर महाराष्ट्र एकवटला!””सरळ रेल्वे मार्गच हवा – वळणाचा मार्ग मान्य नाही!””क्रांतीदिनी जनतेचा एल्गार – नाशिक–पुणे सरळ रेल्वे मार्गाचा अधिकार!”

