लेखक:- आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त
साहित्यिक व अभंगकार
प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
अमरावती :८०८७७४९६०९

महाकवी, युगपुरुष, भारताचे मानबिंदू , साहित्यातील अनभिषिक्त सम्राट,गीतांजलीकार ,शब्दांचे जादूगार,काव्यऋषी ,कवी, लेखक, तत्त्वज्ञ,भारताचे महान सुपुत्र, नोबेल पुरस्कार विजेते गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी असलेल्या ८५ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥
गुरुदेव रवींद्रनाथ टागोर हे भारताचे एक महान कवी, लेखक, तत्त्वज्ञ आणि संगीतकार होते.त्यांचा जन्म ७ मे १८६१ रोजी कोलकात्यामधील एका श्रीमंत आणि सुशिक्षित कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव देवेंद्रनाथ आणि आईचे नाव शारदा देवी होते. लहानपणापासूनच त्यांना वाचन, लेखन आणि निसर्गाची प्रचंड ओढ होती. त्यांनी वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी पहिली कविता लिहिली होती. त्यांनी 'भानुसिंह' या टोपण नावाने देखील सुरुवातीच्या काळात लेखन केले.
रवींद्रनाथ टागोरांनी भारताचे राष्ट्रगीत 'जन गण मन' ची रचना केली आहे. त्यांनी बांगलादेशचे राष्ट्रगीत 'अमार शोनार बांगला' देखील लिहिले आहे. दोन देशांचे राष्ट्रगीत लिहिणारे ते जगातील एकमेव कवी आहेत. त्यांच्या साहित्यातील अमूल्य योगदानाबद्दल त्यांना 'गुरुदेव' म्हणून ओळखले जाते. १९१३ मध्ये त्यांच्या 'गीतांजली' या काव्यसंग्रहासाठी त्यांना नोबेल पुरस्कार मिळाला.
नोबेल पुरस्कार मिळवणारे ते पहिले आशियाई आणि पहिले भारतीय व्यक्ती होते. त्यांच्या साहित्यात मानवी भावना, निसर्ग आणि राष्ट्रभक्तीचे सुंदर वर्णन आढळते. त्यांनी ‘गोरा’, ‘घरे-बाइरे’ आणि ‘चोखेर बाली’ यांसारख्या प्रसिद्ध कादंबऱ्या लिहिल्या. ‘डाकघर’ आणि ‘काबुलीवाला’ या त्यांच्या अत्यंत लोकप्रिय कथा आहेत. टागोरांनी सुमारे २,००० पेक्षा जास्त गाण्यांची रचना केली, ज्यांना ‘रवींद्र संगीत’ म्हणतात. त्यांनी वयाच्या ६० व्या वर्षानंतर चित्रकलेला सुरुवात केली आणि हजारो चित्रे काढली.
रवींद्रनाथ टागोर यांनी शांतिनिकेतन येथे ‘विश्वभारती विद्यापीठाची’ स्थापना केली . ही संस्था निसर्गाच्या सानिध्यात, खुल्या वातावरणात शिक्षण देण्यासाठी प्रसिद्ध आहे. ब्रिटीश सरकारने त्यांना ‘सर’ (नाइटहूड) ही मानाची पदवी दिली होती. मात्र १९१९ मधील जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून त्यांनी ही पदवी परत केली. त्यांचे विचार अत्यंत पुरोगामी, मानवतावादी आणि जागतिक शांततेला पूरक होते. त्यांनी महात्मा गांधींना ‘महात्मा’ ही पदवी दिली होती. गांधीजींनी त्यांना ‘गुरुदेव’ ही पदवी देऊन त्यांचा सन्मान केला होता. टागोरांचे साहित्य आजही जगभरातील लोकांना प्रेरित करत आहे. त्यांनी भारतीय संस्कृती आणि कला साहित्याला जागतिक पातळीवर एक नवी ओळख मिळवून दिली. त्यांचा जन्मदिवस ‘रवींद्र जयंती’ म्हणून दरवर्षी मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. त्यांचे जीवन आणि विचार आजही प्रत्येक पिढीसाठी आदर्श आहेत. आधुनिक भारताच्या जडणघडणीत त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.
गीतांजली’ हा भारतीय कवी, तत्त्वचिंतक आणि लेखक रवींद्रनाथ टागोर यांचा जगप्रसिद्ध अत्यंत लोकप्रिय आणि अद्वितीय काव्यसंग्रह आहे. या अजरामर कृतीने भारतीय साहित्याला जागतिक स्तरावर एक अभूतपूर्व ओळख मिळवून दिली. ‘गीतांजली’ हा शब्द गीत + अंजली दोन शब्दांनी बनलेला असून ज्याचा अर्थ “गाण्यांचे अर्घ्य” किंवा “गीतांचे देणे” असा आहे. हा काव्यसंग्रह मूळ बंगाली भाषेत लिहिलेला असून, तो १४ ऑगस्ट १९१० रोजी भारतात प्रकाशित झाला होता. यामध्ये एकूण १५७ कवितांचा समावेश होता. रवींद्रनाथ टागोर यांना १९१३ मध्ये साहित्यासाठीचा प्रतिष्ठित ‘नोबेल पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. साहित्यातील नोबेल पारितोषिक मिळवणारे ते पहिले भारतीय आणि पहिले बिगर-युरोपीय व्यक्ती ठरले. टागोरांनी स्वतः यातील निवडक कवितांचा इंग्रजीत गद्य-काव्यात्मक अनुवाद केला, जो १९१२ मध्ये लंडनच्या ‘इंडिया सोसायटी’द्वारे प्रसिद्ध करण्यात आला. इंग्रजी आवृत्तीमध्ये १०३ कविता आहेत आणि त्याला प्रसिद्ध आयरिश कवी विल्यम बटलर येट्स (W.B. Yeats) यांनी सुंदर प्रस्तावना लिहिली. या काव्यसंग्रहाचा मुख्य गाभा अध्यात्म आणि निसर्गाप्रती असलेले अपार प्रेम हा आहे. केवळ धार्मिक पूजापाठ न करता, शेतात घाम गाळणाऱ्या शेतकऱ्यात आणि कष्टकऱ्यांमध्ये देव शोधण्याचा उदात्त संदेश यात दिला आहे. गीतांजलीतील ३५ वी कविता (इंग्रजी आवृत्तीनुसार) अत्यंत प्रसिद्ध आहे, ज्याची सुरुवात “Where the mind is without fear…” (जिथे चित्त भयशून्य असते…) अशी होते. यात त्यांनी भारतासाठी एका आदर्श आणि स्वतंत्र राष्ट्राची प्रार्थना केली आहे. गीतांजलीची रचना अत्यंत साधी, प्रासादिक भाषेत आणि संगीतमय आहे. ही केवळ वाचायची कविता नसून ती गाता येण्यासारखी पदे आहेत.
रवींद्रनाथ टागोर यांच्या जगप्रसिद्ध ‘गीतांजली’ काव्यसंग्रहातील गाता येण्यासारख्या गेय कविता ज्यांना ‘रवींद्र संगीत’ म्हटले जाते त्या अनेक नामांकित आणि दिग्गज गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात गायल्या आहेत.या कवितांचे गायन करणारे भारतीयच नव्हे तर आंतरराष्ट्रीय गायकांनीही तू सुमधुर आवाजात गायन केलेले आहेत . गीतांजली काव्यसंग्रहातील पारंपारिक बंगाली व इंग्रजी रचना कनिका बॅनर्जी आणि सुचित्रा मित्रा यांनी गायन केलेल्या आहेत. त्या रवींद्र संगीतातील अत्यंत आदरणीय आणि अग्रगण्य गायिका होत. हेमंत कुमार यांच्या धीरगंभीर आवाजातील गीतांजलीतील गीते प्रचंड लोकप्रिय झालेली आहेत. देबब्रत बिश्वास हे वेगळ्या शैलीत रवींद्र संगीत गाणारे प्रसिद्ध गायक आहेत.चिन्मय चॅटर्जी आणि द्विजेन मुखर्जी, शांतीदेव घोष टागोरांच्या सानिध्यात संगीत शिकलेले ज्येष्ठ गायक होतं.
आधुनिक आणि समकालीन लोकप्रिय गायकांमध्ये श्रावणी सेन, जयती चक्रवर्ती ,स्वागतलक्ष्मी दासगुप्ता,श्रीराधा ,अदिती मोहसिन ,प्रमिता मल्लिक तसेच भारतीय चित्रपटसृष्टीतील पार्श्वगायक ज्यांनी हिंदी व इतर भाषांत या रचना गायल्या आहेत. लता मंगेशकर आणि आशा भोसले यांनी अनेक बंगाली रवींद्र संगीत तसेच हिंदी अनुवादातील गाणी रेकॉर्ड केली आहेत.किशोर कुमार यांनी गायलेली रवींद्र संगीताची गाणी आजही ऐकली जातात.कविता कृष्णमूर्ती, श्रेया घोषाल, आणि अरिजीत सिंग या आधुनिक काळातील गायकांनीही गीतांजलीतील अनेक गाण्यांना नव्याने आवाज दिला आहे.
युनेस्कोच्या (UNESCO) जागतिक स्तरावरील प्रतिनिधी संकलनाचा हा काव्यसंग्रह एक महत्त्वाचा भाग आहे. मराठीतही गीतांजलीचे अनेक लेखकांनी सुंदर भावानुवाद व रूपांतर केले आहे.’गीतांजली’ हे केवळ एका कवीचे काव्य नसून मानवतेला अर्पण केलेली एक भावांजली आहे.
दि .७ ऑगस्ट १९४१ रोजी हे महान विचारवंत आणि साहित्यिक अनंतात विलीन झाले.भारताचे एक महान कवी ,लेखक ,संगीतकार यांच्या दि. ७ ऑगस्ट २०२६ रोजी असलेल्या ८५ व्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन ॥

