
नामपूर, दि. ७ ऑगस्ट : महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय, नामपूर येथे सुरक्षा समिती व इको क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘विषमुक्त शेती – विषमुक्त अन्न’ या विषयावरील जनजागृती शिबिर उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. बी. कदम होते. कार्यक्रमाचे संयोजन डॉ. आनंद एस. जोशी यांनी केले.त्यात त्यांनी शाश्वत शेती ची गरज अधोरेखित केली व पाहुण्यांचा परिचय करून दिला.
प्रमुख मार्गदर्शक श्री. दिनेश वाघ यांनी सेंद्रिय शेतीचे पर्यावरणीय, आर्थिक व आरोग्यदृष्ट्या असलेले महत्त्व विद्यार्थ्यांना विविध उदाहरणांच्या माध्यमातून पटवून दिले. रासायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय शेतीमुळे जमिनीची सुपीकता टिकून राहते, उत्पादन खर्च कमी होतो, विषमुक्त व सकस अन्ननिर्मितीला चालना मिळते आणि पर्यावरणाचे संवर्धन होते, असे त्यांनी सांगितले. गांडूळ हे शेतकऱ्याचा खरा मित्र असून ते जमिनीची सुपीकता वाढविण्यात महत्त्वाची भूमिका बजावते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मा. सौ. प्रियंका अहिरे यांनी निरोगी जीवनशैली, आयुर्वेद आणि विषमुक्त अन्न यांचा परस्परसंबंध स्पष्ट करत जागतिक आरोग्य संघटना (WHO) यांच्या आरोग्यविषयक संकल्पनांची माहिती विद्यार्थ्यांना दिली. श्री. अभय रत्नपारखी यांनी विषमुक्त शेतीचा प्रसार करण्यासाठी युवकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले, तर कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य श्री. एम. व्ही. दासनूर यांनी सेंद्रिय शेतीच्या विविध पद्धती व कमी खर्चात दर्जेदार उत्पादन घेण्याविषयी मार्गदर्शन केले.
अध्यक्षीय समारोपात प्राचार्य डॉ. यू. बी. कदम यांनी रासायनिक खतांचा व कीटकनाशकांचा अतिवापर शेतकरी आणि ग्राहकांच्या आरोग्यास घातक ठरत असल्याचे सांगून विषमुक्त शेतीचा व्यापक प्रसार करण्याची आवश्यकता व्यक्त केली.
यावेळी वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अनिल सावळे, प्रा सोमनाथ महाले, प्रा राम बागुल, प्रा. चैतन्य ठाकूर, प्रा. सुनील खैरनार यांच्यासह कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. अमित सोनवणे यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. चैतन्य ठाकूर यांनी मानले.

