
विंचूर ( प्रतिनिधी )निफाड रोड, लक्ष्मी मार्केट शेजारील तसेच मशिदीसमोरील कॉलनी रोडची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून पायी चालणेही कठीण झाले आहे. दुचाकी व चारचाकी वाहने चालवणे धोकादायक बनले आहे.

या रस्त्यावरील पाईपलाईन फुटल्यामुळे संपूर्ण कॉलनी परिसरात पाणी साचले असून नागरिकांना ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही रहिवाशांना आपली चारचाकी वाहने घरातून बाहेर काढणेही कठीण झाले आहे. पायी जाणाऱ्या नागरिकांना कॉलनीला वळसा घालून जावे लागत आहे.

या समस्येकडे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच तसेच स्थानिक ग्रामपालिका सदस्यांनी तातडीने लक्ष देऊन रस्त्याची पाहणी करावी, खराब झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करावी व फुटलेली पाईपलाईन त्वरित दुरुस्त करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

