नाशिक (प्रतिनिधी):- प्राचीन ऋषीमुनींनी उदबोधक विचारांतून आपल्याला आत्मानंद दिला आहे. सामाजिक, पर्यावरण, नैतीक मूल्यांची शिकवण म्हणजे आत्मशांतीचा मार्ग आहे. आजच्या धावपळीच्या आणि तणावाच्या बदलत्या मानसिकतेच्या ऋषींनी सांगितलेल्या स्थिर विचारांसाठी आत्मिक शांतीची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक सुभाष सबनीस यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित 'पुस्तकावर बोलू काही' या उपक्रमात २७५वे पुष्प 'भारतीय परंपरेतील १११ ऋषी' या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक नरेश महाजन होते.
सुभाष सबनीस पुढे म्हणाले की, वेदशास्राचा अभ्यास करणारी व्यक्ती म्हणजे ऋषी. ऋषींनी आपल्या अभ्यासातून आणि आचरणातून भारतीय संस्कृतीत आदर्श निर्माण केला. विविध संशोधने त्यांनी केली. संस्कृती टिकविण्याचे काम ऋषीमुनींनी केले. आपण तंत्रज्ञानाच्या जगात कितीही पुढे गेलो असलो तरी मानसिक नैराश्य आणि मूल्यांची घसरण होत आहे. त्यामुळे भरकटलेल्या वातावरणात मानवी मनाला पुन्हा एकदा एकाग्रचित्त करून जगण्याला खरा अर्थ देण्याचे सामर्थ्य फक्त आपल्या महान अशा समृद्ध परंपरेत आहे. या समृद्ध परंपरेचा पाया थोर ऋषीमुनी यांनी घालून दिला, असेही ते म्हणाले.
ज्येष्ठ समीक्षक प्रा.सुनील हिंगणे आणि रंजना बोरा यांना ग्रंथभेट देण्यात आली. ॲड.मिलिंद चिंधडे यांनी आभार मानले तर सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या मंगळवारी (३०) रज्जाक शेख 'गगनातले तारे' या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.