
*ढकांबे ( प्रतिनिधी)स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ढकांबे, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा उत्साहात पार पडला. नाशिक येथील विमा सल्लागार शरद लोखंडे पाटील यांच्या सौजन्याने शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली ते सातवीमध्ये गुणानुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना बक्षिसे देऊन त्यांचा सत्कार व गौरव करण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन मिळावे आणि इतर विद्यार्थ्यांमध्येही अभ्यासाची प्रेरणा निर्माण व्हावी, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका वंदना कदम मॅडम, शिक्षक चिंतामण भदाणे सर, शांताराम गुंजाळ सर, सुगंधा साळुंखे मॅडम, पंकज कलाल सर, संजय चव्हाण सर, तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रमोद बोडके, पंकज बोडके, गोपीनाथ बुणगे आदी उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा गौरव करून त्यांना प्रोत्साहन देण्याच्या या उपक्रमाबद्दल शाळेच्या वतीने शरद लोखंडे पाटील यांचे आभार मानण्यात आले. त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि ग्रामस्थांकडून कौतुक करण्यात आले.

