
जव्हार : पवित्र श्रावण महिना सुरू होताच जव्हार शहर भक्तिमय झाले आहे. शहरातील प्रत्येक मंदिरात रोज संध्याकाळी भजनाचा जागर सुरू करण्यात आला असून, याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
श्रीराम पुरुष भजनी मंडळ, जव्हार यांच्या वतीने हा उपक्रम संपूर्ण श्रावण महिनाभर राबवण्यात येत आहे. रोज सायंकाळी ठीक ७ ते ९ वाजेपर्यंत जव्हार मधील प्रमुख १० मंदिरांमध्ये भजन केले जात आहे –

- हनुमान पॉईंट – काट्या मारुती मंदिर
- धाकटी जेजुरी – खंडेराव महाराज मंदिर
- अंबिका चौक – अंबिका माता मंदिर
- गांधी चौक – शनिदेव मंदिर
- विठ्ठल रखुमाई मंदिर
- जुना राजवाडा – गणपती बाप्पा मंदिर
- महादेव आळी – शंकर भगवान मंदिर
- मोर्चा यशवंत नगर – आई महालक्ष्मी मंदिर
श्री स्वामी समर्थ मंदीर
श्री गजानन महाराज मंदीर
फोटोमध्ये दिसत असल्याप्रमाणे महादेव आळी येथील शंकर मंदिर व जुना राजवाडा गणपती बाप्पा मंदीर. पेटी, टाळ, मृदंगाच्या साथीने भजनी मंडळाचे सदस्य भजनात तल्लीन झालेले दिसत आहेत. मागे भिंतीवर “ज्याच्या स्मरणे पतीत तरती तो शंभू सोडू नको” हा शिवाचा संदेश देखील याचे पावित्र्य वाढवत आहे.
यावेळी मंडळाच्या अध्यक्षांनी आवाहन केले की, “आजच्या तरुण पिढीने मोबाईलमध्ये रील्स बघण्यात वेळ वाया न घालवता, दोन तास देवाच्या नामस्मरणात, भजनात येऊन सामील व्हावे. आपली संस्कृती हाच आपला खरा ठेवा आहे.”
सर्व जव्हारकर भाविकांना, विशेषतः नवतरुणांना या भक्तिमय सोहळ्यात जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष, श्रीराम पुरुष भजनी मंडळ, जव्हार यांच्याकडून करण्यात आले आहे.


