
देशातील सर्वधर्मियाचे सर्वधर्मीयांचे सण- उत्सव, समारंभ हे पर्यावरणपूरक करण्याचे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने केलेले आहे.
पर्यावरण स्नेही उत्सवासाठी समितीने सुरुवातीपासून व्यापक प्रबोधन व कृती कार्यक्रम राबवलेले आहेत. त्यामध्ये ‘विसर्जित गणपती दान करा – निर्माल्य गोळा करा’, ‘ फटाके मुक्त दिवाळी, फटाके मुक्त नवीन वर्ष, ‘होळीची पोळी गरजूला द्या होळी लहान करा’, बकरी ईद निमित्त रक्तदान शिबिर, ‘पर्यावरण स्नेही रंगपंचमी’ असे विविध उपक्रम समाजात राबवण्याचे काम महा अंनिस ने केले आहे.
समितीने सुरू केलेले हे उपक्रम समाज व शासनमान्य झालेले आहेत.सर्व जाती धर्मातील सण उत्सव हे पर्यावरणपूरक व्हावेत ही अंनिस ची भूमिका राहिलेली आहे.
मानवी जीवनाला तसेच पशुपक्ष्यांना घातक ठरणाऱ्या डॉल्बीचा दणदणाट गेल्या काही वर्षात वाढत आहे, राज्यातून हद्दपार झालेली डॉल्बी गेल्या काही दिवसापासून पुन्हा जोमाने घुमू लागली आहे.
राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्तींनी आपला प्रभाव दाखवला तर हे घडणार नाही. नागरीकांनाही महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आवाहन आहे की त्यांनी कोणताही सण, समारंभ, उत्सव हा निसर्गाला ओरबाडून किंवा त्याला हानी पोहोचून साजरा करणार नाही यासाठी कटिबद्ध राहावे.

येणारा गणेश उत्सव हा डॉल्बीचा आणि लेझर बीमचा वापर टाळून पर्यावरण स्नेहीपद्धतीने साजरा करावा.यासाठी
संघटनेच्या वतीने जनप्रबोधन करण्यात येत आहे.
खरंतर धार्मिक श्रद्धेशी या डॉल्बीचा काहीही संबंध नाही. श्रद्धेचा संबंध भक्तिशी असतो. आणि डॉल्बीचा संबंध उन्मादाशी आहे. म्हणून सर्वांनाच त्रासदायक ठरणाऱ्या डॉल्बीला समाजातून हद्दपार करण्याचा निर्धार सर्वांनी करावा असे आवाहन महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्याध्यक्ष संजय बनसोडे, प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य सदस्य कृष्णा चांदगुडे, जिल्हा कार्याध्यक्ष प्रा. आशा लांडगे, प्रधान सचिव नितीन बागुल, अरुण घोडेराव, प्रा. डॉ. सुदेश घोडेराव,राजेंद्र फेगडे,प्रल्हाद मिस्त्री, महेंद्र दातरंगे, सुशील कुमार इंदवे आदींनी केले .

