
मुळडोंगरी, दि. ५ सप्टेंबर : सरस्वती माध्यमिक विद्यालय, मुळडोंगरी येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी संपूर्ण विद्यालय परिसर कृष्णमय झाला होता.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस भगवान श्रीकृष्णाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी श्रीकृष्ण, राधा तसेच गोप-गोपींच्या वेशभूषेत सहभागी होऊन उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कृष्णजन्म, गवळण, भजन, गीत व नृत्याने कार्यक्रमात रंगत आणली.
उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते गोपाळकाला व दहीहंडी. विद्यार्थ्यांनी उत्साहाने दहीहंडी फोडून आनंदोत्सव साजरा केला. “गोविंदा आला रे आला!” या जयघोषाने विद्यालयाचा परिसर दुमदुमून गेला.
या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना श्रीकृष्णाच्या जीवनातील प्रेम, मैत्री, धैर्य, कर्तव्यनिष्ठा आणि एकतेचे मूल्य समजले. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष शोभा प्राप्त झाली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. उत्साह, आनंद आणि भक्तिभावाने भरलेल्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता झाली.

