
लोहोणेर येथील जनता विद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त घोषवाक्य लेखनातून साक्षरतेचे महत्त्व सांगताना विद्यार्थी. समवेत मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के, शिक्षक व शिक्षकेतर सेवकवृंद. (छाया : सुनील एखंडे)
लोहोणेर : ( प्रतिनिधी ) येथील मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या जनता विद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांनी आकर्षक व प्रेरणादायी घोषवाक्यांच्या माध्यमातून साक्षरतेचे महत्त्व अधोरेखित करत शिक्षणाचा संदेश दिला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के होते. यावेळी विद्यालयातील शिक्षकवृंद व शिक्षकेतर सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी साक्षरतेचे महत्त्व सांगणारी विविध घोषवाक्ये सादर केली. “साक्षरतेचा प्रकाश पसरवूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया!”, “एक पाऊल शिक्षणाकडे, हजार पावले प्रगतीकडे!”, “साक्षर समाज घडवूया, देशाचा विकास साधूया!” अशा घोषवाक्यांतून विद्यार्थ्यांनी उपस्थितांमध्ये साक्षरतेविषयी जनजागृती केली.यावेळी सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांनी आपल्या मनोगतात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन साजरा करण्यामागील हेतू व उद्देश स्पष्ट केला. साक्षरता ही केवळ वाचन-लेखनाची क्षमता नसून व्यक्तीला आत्मनिर्भर, जागरूक आणि जबाबदार नागरिक बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे, असे त्यांनी सांगितले. शिक्षणामुळे व्यक्तीच्या विचारांना दिशा मिळते आणि समाजाच्या प्रगतीला चालना मिळते. त्यामुळे प्रत्येकाने शिक्षणाचे महत्त्व ओळखून इतरांनाही शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन त्यांनी केले.अध्यक्षीय मनोगतात मुख्याध्यापक जिभाऊ शिर्के यांनी शिक्षणाचे जीवनातील महत्त्व विशद केले. साक्षर नागरिक हा आपल्या हक्कांविषयी जागरूक असतो तसेच कर्तव्यांची जाणीव ठेवतो. शिक्षणामुळे अंधश्रद्धा, अज्ञान आणि सामाजिक विषमता दूर करण्यास मदत होते. प्रत्येक व्यक्तीने साक्षर होण्यासोबतच आपल्या कुटुंबातील व समाजातील निरक्षर व्यक्तींना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी योगदान द्यावे, असे त्यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी “आपण साक्षर होऊ, इतरांनाही साक्षर करू” असा संकल्प केला. घोषवाक्य लेखन व सादरीकरणातून विद्यार्थ्यांनी साक्षरतेचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक समिती प्रमुख सुनील एखंडे यांनी केले.

