
सिन्नर (प्रतिनिधी)
समाजात अंधश्रद्धेचे पीक आले असून आपल्या भौतिक सुखासाठी भोंदू बाबांच्या नादी लागून समाजाचे मानसिक, व आर्थिक शोषण होत आहे.विवेक,नैतिक मूल्यांची घसरण होत आहे,त्यासाठी समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा,परंपरा नष्ट करण्यासाठी अंधश्रद्धा जादूटोणा विरोधी कायद्याची माहिती करून घेणे काळाची गरज आहे असे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे बहि: शाल शिक्षण मंडळाचे व्याख्याते तसेच महाराष्ट्र अंनिस चे जिल्हा उपाध्यक्ष डॉ.श्यामसुंदर झळके यांनी केले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर संशोधन,प्रशिक्षण संस्था ( बार्टी )

अंतर्गत येथील श्रीमती पुष्पावती नवजीवन डे स्कूल मध्ये आयोजित ” महाराष्ट्र नरबळी,अंधश्रद्धा निर्मूलन,जादूटोणा अधिनियम २०१३ माहिती कार्यशाळेत डॉ.झळके बोलत होते.व्यासपीठावर प्राचार्या अनिता सूर्यवंशी,मुख्याध्यापिका सविता फड,बार्टीच्या सविता उबाळे,डिंपल पाटील,योगिता भाटजीरे,बाळासाहेब पाटील,अरुण चव्हाण,सुदाम चव्हाण,आरती लहरे उपस्थित होते. आपल्या भाषणात डॉ.श्यामसुंदर झळके यांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अधोरी प्रथा व जादूटोणा अधिनियम २०१३ बद्दल माहिती देऊन समाजातील अंधश्रद्धा व अघोरी,अनिष्ट प्रथा समूळ नष्ट करण्यासाठी या कायद्याची माहिती करून घेण्याचे तसेच भोंदू बाबांचा पर्दाफाश करण्यासाठी महाराष्ट्र अंनिसच्या चळवळीत सहभागी होण्याचे आवाहन केले. यावेळी त्यांनी भोंदू बाबा अशोक खरात तसेच इतर अनेक भोंदू बाबांबद्दल माहिती देऊन समाजात वैद्न्यानिक दृष्टिकोन,विवेकी विचार तसेच संत,समाज सुधारकांचे विचार पुढे नेण्याचे तरुणांना आवाहन केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक सविता उबाळे आणि केले तर आभार योगिता भाटजीरे यांनी मानले.

