
सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये ठेकेदारांमार्फत केलेल्या कामांचे देयक( बिल) करण्यासाठी मोजमाप पुस्तक (एमबी) मध्ये झालेल्या कामांची मोजमापे नोंदविली जातात. ही मोजमापे सक्षम अभियंता मार्फत नोंदविली जातात. जी मोजमापे नंतर झाकली जातात; जसे पायासाठी केलेले खोदकाम व बांधकाम हे जमिनीखाली बुजविले जाते. त्याची मोजमापे ही झाकलेली किंवा ‘हिडन मेजरमेंट’ असतात. ती नोंदविणाऱ्याच्या विश्वासार्हतेवर एका जबाबदार वरिष्ठ अभियंता कडून शंभर टक्के तपासून नोंदविली जातात. ही मोजमापे सहसा परत तपासता येत नाही. ती एखाद्या हिमनगाच्या पाण्याखालील भागासारखी असतात. या आशयाच्या शीर्षकाची’ हिडन मेजरमेंट’ ही कादंबरी जलसंपदा विभागातील निवृत्त भांडार अधीक्षक गोविंद काळे यांनी लिहिलेली आहे. यापूर्वी लेखक गोविंद काळे यांनी लिहिलेल्या दोन ऐतिहासिक चरित्र कादंबऱ्या आहेत. पण धरण बांधकामाविषयी असलेली ही एक सामाजिक आशयाची कादंबरी लिहिण्याचे मोठे आव्हान लेखकाने समर्थपणे पेलले आहे,असे कादंबरी वाचल्यानंतर लक्षात येते.
धरण आणि कालव्यांचे बांधकाम हा विषय खरं तर मराठी साहित्यात अभावानेच चित्रीत झाला आहे. गो. नी. दांडेकर यांची ‘आम्ही भगीरथाचे पुत्र’, ना.द.जोशी यांची’धरण’ तसेच धरणांमुळे विस्थापित झालेल्यांची विश्वास पाटील यांची ‘झाडाझडती’, ल.म. कडू यांची ‘धरणकळा’, कृष्णात खोत यांची ‘रिंगाण’ या सर्व कादंबऱ्या धरणांचे नकारात्मक परिणाम दाखवणाऱ्या, विस्थापितांचे दैन्य दाखविणाऱ्या आहेत. पण विलास शेळके यांच्या’धरणसूक्त’ आणि ‘मोगलाई’ या कादंबऱ्या विस्थापितांच्या प्रश्नांच्या सोडवणुकी बरोबरच धरणांचे सकारात्मक परिणाम दाखविणाऱ्या आहेत. याच मालिकेत लेखक गोविंद काळे यांची ‘हिडन मेजरमेंट’ ही प्रस्तुत कादंबरी भर टाकणारी आहे. कदाचित धरणाचे सकारात्मक परिणाम दाखविणारे हे दोन्ही लेखक प्रत्यक्ष धरण निर्मितीच्या कार्यात सहभागी असल्यामुळे असेल पण त्यांच्या या कादंबऱ्या वाचकांनाही धरणांकडे बघायचा एक सकारात्मक दृष्टिकोन देतात, की जो विकासासाठी आवश्यक ठरतो.
प्रस्तुत कादंबरीची बीजं लेखक गोविंद काळे हे कवी देखील असल्यामुळे त्यांनी यापूर्वी लिहिलेल्या ‘धरणगाणी’ या काव्यसंग्रहात सापडतील. जेव्हा काव्यसंग्रहाचा पद्य अवकाश कमी पडला तेव्हा त्यांना व्यक्त होण्यासाठी अधिकचा गद्य अवकाश शोधावा लागला. आणि अनुभवांच्या या जल- आशयासाठी त्यांनी ही कादंबरी लिहिली आहे.
कादंबरीचा नायक अरुण हा एका धरणग्रस्त शेतकऱ्याचा पुत्र आहे. त्याचं गाव, घर, शेती सगळं काही धरणाच्या बुडितात जाते .पण वडिलांच्या जिद्दीमुळे तो पुनर्वसित गावठाणा मध्ये राहून, शिकून स्वतः इंजिनियर होतो. आणि त्याच धरणावर अभियंता म्हणून नोकरीला देखील लागतो. पण ज्या धरणाने त्याला विस्थापित केले त्या धरणाकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन अतिशय विधायक असतो. निस्पृहपणे काम करणाऱ्या या नायकाचा धरण हाच ध्यास आणि श्वास बनतो. ध्यानीमनी जागता- झोपता तो धरणाची स्वप्नं बघतो. त्याची प्रेयसी आणि पत्नी, आई- वडील या सगळ्यांना आणि पुनर्वसित शेतकऱ्यांना देखील धरण या गोष्टीचे तो महत्त्व पटवून देतो.
धरणाच्या सर्वेक्षणापासून धरणाचे भूमिपूजन, धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम ते कालव्यातून पाणी सोडून होणारे सिंचन या सर्व प्रसंगांचे वर्णन करणारा एक मोठा कालपट या कादंबरीचा कॅनव्हास आहे. अशा प्रसंगांमध्ये सहजपणे येणारे राजकारण, समाजकारण, अर्थकारण त्यामागचे मानवी स्वभाव, स्वार्थ आणि हेतू अगदी तपशीलवारपणे समोर येतात. तसे धरणाचे प्रत्यक्ष बांधकाम-दगडी बांधकाम आणि काँक्रीट ,कालव्याचे सर्वेक्षण आणि कालव्याचे रोजगार हमी योजनेमार्फत होणारे खोदकाम, मजुरांचे वेतनाचे प्रश्न, त्यावर काढलेला तोडगा असे अनेक तांत्रिक तपशील सहजपणे वाचकांना समजेल अशा सोप्या पद्धतीने लेखकाने मांडले आहेत. मात्र या सर्व प्रसंगी एक सहृदयी, सजग इंजिनियर नायक उभा असल्याने ते निर्जीव न राहता सजीव होतात. अरुण अधिकार पदाच्या उतरंडीमध्ये अगदी तळाला म्हणजे ज्युनिअर इंजिनियर किंवा ओवरसियर असला तरी त्याचे त्याच्या कामावरील निष्ठेमुळे धरणांवर निरतिशय प्रेम आहे. त्यामुळे तो डोळ्यात तेल घालून धरणाच्या बांधकामावर स्वतः लक्ष ठेवतोच पण त्याच्या हाताखालील गवंडी, मुकादम यांना देखील देखरेख करण्यासाठी दक्ष राहण्यास शिकवतो. प्रामाणिकपणे काम करताना तो मोहाचे अनेक क्षण टाळून भ्रष्ट व्यवस्थेपासून अलिप्त राहतो. हे म्हणजे दलदलीत राहून कमलपत्राप्रमाणे शुद्ध राहण्यासारखे असते. मात्र तो भवतालच्या भ्रष्ट व्यवस्थेला बदलविण्याच्या फंदात न पडता सचोटीने आपले काम चोख करणे पसंत करतो. या कामासाठी त्याला त्याचा रमेश या बालमित्राची मदत होते. जो त्याच्याच कार्यालयात साहाय्यक भांडारपाल पदावर काम करत असतो. आणि सरळ मार्गी इंजिनियर मित्राला सावध करत असतो.
अरुण आणि रमेश यांच्यातील निरपेक्ष मैत्र हे कृष्ण सुदामा सारखे असल्याचा उल्लेख कादंबरीत येतो. आणि ते कसे खरे आहे त्याचा प्रत्ययही कादंबरी मधील अनेक प्रसंगांमधून येतो. विशेषतः अरुण भ्रष्टाचारापासून अलिप्त राहण्यासाठी स्वेच्छा सेवानिवृत्तीचा निर्णय घेतो, त्यावेळी रमेश त्याच्या कुटुंबीयांच्या काळजीपोटी जो दीर्घकालीन रजेचा मार्ग सुचवतो तो कोणी जिवलग मित्रच सुचवू शकतो. रमेश आणि अरुण यांच्यामध्ये विविध प्रसंगी झालेल्या चर्चा त्यांच्या बौद्धिक परिपक्वतेची साक्ष देतात. त्यांनी अशावेळी एकमेकाला दिलेले दृष्टांत, छोट्या-छोट्या बोधकथा या कादंबरीची रंजकता वाढवितातच पण बौद्धिक उंची मध्येही भर टाकतात. अरुण जसा इंजिनियर असून कवी आहे तसा त्याचा मित्र रमेश देखील कविमनाचा आहे. त्यामुळे ते एकमेकाला एवढे समजून घेतात आणि एकमेकांच्या विश्वासाला पात्र ठरतात.
कादंबरीचा नायक नुसता रूक्ष इंजिनियर नाही तर तो देखील कवि मनाचा एक कुटुंबवत्सल गृहस्थ आहे. अरुणच्या आई-वडिलांचे नवरा बायकोचे नाते तसेच अरुण आणि त्याची पत्नी उमा यांचे नाते, अरुणचे पहिले असफल प्रेम असलेल्या सीमा या प्रेयसी बरोबरचे अव्यक्त नाते, दोघांनी मूकपणे स्वीकारलेले घरातील ज्येष्ठांचे निर्णय, हे सगळे वास्तव वाटतात. या सर्वांचे नातेसंबंध अतिशय सहज सुंदर आणि नैसर्गिक वाटतात. त्यामध्ये कुठेही आक्रस्ताळेपणा नाही.
या कादंबरीच्या पार्श्वभूमीवर जरी अनेक पात्रे असली तरी सगळे कथानक केंद्रित होते ते मुख्यतः नायक अरुण, त्याची समजूतदार पत्नी उमा आणि त्याचा मित्र रमेश यांच्या भोवती. हे तिघेही सुखदुःखाच्या प्रसंगी ज्या पद्धतीने चर्चा करून मार्ग काढतात, त्यातून त्यांचा सकारात्मक दृष्टिकोन समोर येतो. त्यांच्या बौद्धिक चर्चांमध्ये धरणांचे रूपकात्मक दर्शन घडते. अरुणच्या भावनेच्या जलाशयाला अडविणारी उमा त्याच्या धरणाच्या भिंती सारखी असते तर भावनेचा पूर आल्यानंतर धरण सुरक्षित राहून पूर जसा सांडगव्यावरून ओसांडून जाण्यासाठी रचना असते तसा रमेश त्याचा सांडवा होतो. आणि भावनेचा पूर ओसंडून गेल्यावर अरूणचा जलाशय शांत होतो. तर धरणाची भिंत सुरक्षित राहते. अशा रूपकांची आणि धरणावरील कवितांची पेरणी या कादंबरीत लेखकाने केलेली आढळते.ती काही ठिकाणी चपखल बसते.मात्र प्रसंगी ती ओढून ताणून काही ठिकाणी घुसविल्यासारखी वाटत राहते. काही प्रेम प्रसंगांमध्ये वि. स. खांडेकरांच्या कादंबरीमध्ये ज्याप्रमाणे सुभाषित वजा वाक्ये येतात ती रोमँटिक असली तरी अनावश्यक नाट्यमयता आणतात.
पाण्याचे दुर्भिक्ष मिटविण्याचे साधन जरी धरण असले तरी ते साध्य नाही. सिंचनातून समृद्धी येण्यासाठी पाण्याचा सुयोग्य वापर महत्त्वाचा आहे. हे पटल्यामुळे धरणातून जेव्हा सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी सोडले जाते, तेव्हा हा इंजिनियर नायक स्वतः कालव्याच्या विमोचकांपासून शेताच्या बांधापर्यंत पायपीट करत हे पाणी शेवटपर्यंत पोहोचते की नाही याची खात्री करण्यासाठी जातो. हा अतिशय महत्त्वाचा प्रसंग ठरतो.
अरुण हा नुसता इंजिनियर नाही तर तो शेतकऱ्याचा पुत्र आणि हाडाचा शेतकरीही आहे त्यामुळे शेतीमातीचे प्रश्न जाणणारा तो भूमिपुत्र ही आहे. पाण्यासाठी शतकानुशतके तहानलेल्या ओसाड जमिनीमधून जेव्हा कालव्याद्वारे पाणी फिरेल तेव्हा जमिनीप्रमाणे तहानलेले शेतकरी देखील आधाशाप्रमाणे या जमिनीला पाणी पाजतील. आणि एक दिवस ही सुपीक जमीन चिबाड होऊन नापीक होईल. हा धोका तो ओळखतो. तसेच अधिक आणि दर्जेदार उत्पादनासाठी शेतीला पाण्या बरोबरच दर्जेदार खताची ही गरज आहे, हे ओळखून तो स्वेच्छानिवृत्ती घेतो. कृषी अधीक्षक भोसले त्याचा हा प्रामाणिकपणा आणि शेतकऱ्यांच्या भविष्याचा विचार बघून त्याला पत्नीच्या नावे खत वितरणाचा परवाना देतात. जेणेकरून स्वेच्छा निवृत्तीनंतर या निस्वार्थी नायकाच्या कुटुंबाच्या भविष्यातील उदरनिर्वाहाची सोय होईल. अरुण स्वेच्छानिवृत्ती घेतो. आणि पत्नीच्या नावे स्वतःच्या दुकानाचे उद्घाटन करतो. जेणेकरून त्याचा रोज शेतकऱ्यांशी संपर्क होत राहील आणि त्यांचे तो मार्गदर्शन व प्रबोधन करू शकेल. कादंबरीचा शेवट असा उदात्त आणि सुखांत होतो. हे या कादंबरीचे वैशिष्ट्य. कादंबरीतील पात्रांचे अवाजवी उदात्तीकरण करण्याचे लेखकाने टाळले आहे.
कादंबरीचे निवेदन साधे, सरळ आणि प्रवाही आहे कादंबरीच्या कथानकाच्या ओघात आलेले सरकारी कार्यालयातील कामकाजाचे वर्णन जे त्याला अपरिचित वाचक आहेत त्यांना आवडेल. धरणाचे भूमिपूजन, उद्घाटन तसेच खताच्या दुकानाच्या उद्घाटन प्रसंगी दिलेली मान्यवरांची उद्बोधक भाषणे ही देखील जमेची बाजू ठरावी. एकंदरीत शेतीमाती आणि पाणी या विषयात रस असणाऱ्या वाचकांसाठी ‘हिडन मेजरमेंट’ही कादंबरी ‘ओपन मेजरमेंट’ ठरावी. यामध्ये लेखकाने खुल्या मनाने धरण निर्मितीच्या प्रक्रिये सोबत भविष्यातील सिंचनाच्या अतिरेकाने होणारा प्रश्न उपस्थित केला आहे!
विलास शेळके
नाशिक
मोबाईल:९४२२२६१८२६
पुस्तकाचे नाव:हिडन मेजरमेंट(कादंबरी)
लेखक: गोविंद काळे
प्रकाशक: दिलीपराज प्रकाशन प्रा.लि. पुणे
पृष्ठे:२४२ किंमत:₹३५०/-

