
साकोरे ( वार्ताहर )पेडकाई माता सामाजिक शैक्षणिक संस्थेचा २८ वा वर्धापन दिन विद्यालयाच्या प्रांगणात उत्साहपूर्ण व आनंदमय वातावरणात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक आणि सामाजिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. संस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाचे विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम, टिपरी नृत्य व स्वागतगीताच्या माध्यमातून जल्लोषात स्वागत केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष दिनेश पाटील होते. यावेळी सचिव राजेंद्र बोरसे, उपाध्यक्ष भारत बोरसे, खजिनदार रविंद्र बोरसे,सशालेय व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पिरनाई तसेच संचालक अशोक बोरसे, प्रकाश सोनेज, विलास बोरसे, संजय बोरसे, रामकृष्ण बोरसे, योगेश पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
विद्यालयाचे उपशिक्षक व्ही. पी. बोरसे यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक तथा संस्थेचे संचालक योगेश पाटील यांनी केले. यावेळी संस्थेच्या पदाधिकारी व संचालकांचा विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. वर्धापन दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. एस.एस.सी. परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्याला प्राथमिक शिक्षक उमेश बोरसे यांच्या वतीने बक्षीस देण्यात आले. तसेच इयत्ता पाचवी व नववीतील प्रथम क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना कै. रमेश कदम यांच्या स्मरणार्थ विलास बोरसे यांच्या वतीने रोख बक्षिसे देण्यात आली. कै. पोपटराव बारकु बोरसे यांच्या स्मरणार्थ टिपरी नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थीनींना देखील रोख बक्षिसे देण्यात आली.
यावेळी विद्यार्थ्यांनी संस्थेच्या कार्याचा गौरव करताना, संस्थेचे ध्येय व धोरण हे समाजातील गरीबातील गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला केंद्रस्थानी ठेवणारे असल्याचे सांगितले. नाममात्र शुल्क, वर्षभर विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक साहित्याचे वाटप, गणवेश वाटप तसेच शासकीय परीक्षांसाठी लागणारी फी शाळेच्या वतीने भरणे अशा विविध सुविधांमुळे विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात पुढे जाण्यास मोठी मदत होत असल्याचे त्यांनी नमूद केले. शिक्षिका पवार मॅडम यांनी संस्थेची स्थापना, तिच्यामागील ध्येय-धोरणे आणि संस्थेच्या आजवरच्या वाटचालीचा आढावा घेतला.
संचालक अशोक बोरसे यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाचे नियोजन, स्वतःच्या पायावर उभे राहण्याची जिद्द आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्याचे मार्गदर्शन केले. बदलत्या काळानुसार नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना घडविले पाहिजे, असे त्यांनी प्रतिपादन केले. परधाडी विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा संचालक प्रकाश सोनेज यांनी संस्थेच्या खडतर प्रवासाचा आणि आजच्या प्रगतीचा आढावा घेतला. संस्थेच्या उभारणीपासून आजपर्यंत विविध मान्यवरांनी दिलेल्या योगदानाचा उल्लेख करताना नाशिक येथील कासलीवाल परिवार, धरमशेट कासलीवाल, सुलाणे परिवार यांच्यासह संस्थेच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या अनेक व्यक्तींचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक स्मरण केले. या सर्वांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या नावाची कोनशिला उभारण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात संस्था महाविद्यालय व इंग्लिश मीडियम शिक्षणाच्या दिशेनेही वाटचाल करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अध्यक्षीय भाषणात दिनेश पाटील यांनी संस्थेने विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिलेल्या भौतिक सुविधा व शैक्षणिक साहित्याचा शिक्षकांनी योग्य वापर केल्यामुळे विद्यालयातील विद्यार्थी आज विविध क्षेत्रांत यशस्वी होत असल्याचे सांगितले. अनेक विद्यार्थी शासकीय व निमशासकीय सेवेत, उद्योग-व्यवसायात, विविध कौशल्यपूर्ण क्षेत्रांत कार्यरत असून काही विद्यार्थी उच्च शिक्षण घेत असल्याचा अभिमान त्यांनी व्यक्त केला. संस्थेची ही यशस्वी वाटचाल यापुढेही नव्या दिशा आणि नव्या संकल्पांसह सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाबड सर यांनी केले, तर आभार सुरसे एस. जी. यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन देऊन करण्यात आली.संस्थेच्या २८ वर्षांच्या ज्ञानयात्रेचा गौरव करत, सामाजिक बांधिलकी, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याचा संकल्प घेऊन वर्धापन दिन उत्साहात संपन्न झाला.

