
नाशिक:- ( प्रतिनिधी ) जीवन जगत असताना अनेक खाचखळगे येतातच. तरीही आयुष्य सुंदर आहेच. ते अधिक सुंदर करण्यासाठी अगोदर उत्तम आचरण स्वतःपासून करावे, असे प्रतिपादन युवाकवी रज्जाक शेख यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ या उपक्रमात २७६वे पुष्प गुंफताना ‘गगनातले तारे’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करत होते. अध्यक्षस्थानी योगाचार्य अशोक पाटील होते.
रज्जाक शेख पुढे म्हणाले की, आयुष्य सुंदर असल्यानेच माणसाच्या जगण्याला उभारी मिळत असते. आपल्या वाटचालीला सकारात्मक विचारांची गरज आहे. सकारात्मक विचारांमुळेच नावीन्यपूर्ण काम करण्याची जिद्द निर्माण होते. जग बदलण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण करत आत्मविश्वास दांडगा करणाऱ्या जगण्याचा मंत्र या संग्रहातील कवितांमध्ये मांडलेला आहे, असे सांगून संग्रहातील काही कविता सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
सय्यद जावेद अली आणि प्रवीण सोनवणे यांना ग्रंथभेट देण्यात आली. सुहास टिपरे यांनी सूत्रसंचालन केले तर आभार मधुकर गिरी यांनी मानले. दरम्यान येत्या शुक्रवारी (२) युवाकवी दिगंबर देवढे ‘नांगराचा घाव’ या काव्यसंग्रहावर ऐसपैस गप्पा मारणार आहेत.

