
मनमाड ( प्रतिनिधी) – येथील मनमाड साहित्य संघ आयोजित ‘साहित्य- कुतूहल'( साहित्यिक गप्पागोष्टी ) हा अनोखा कार्यक्रम मोठ्या उत्साहात मान्यवर साहित्यिक, सदस्य व पत्रकारांच्या उपस्थितीत येथील काकडे निवासस्थानी संपन्न झाला. साहित्य,कला व माध्यमे या विषयांवर या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगोपांग चर्चा होऊन मनमाड साहित्य संघाच्या भविष्यकालीन योजनांबद्दल विचारविनिमय करून उपक्रमांचे नियोजनही यानिमित्ताने आखण्यात आले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनमाड साहित्य संघाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक श्री. सदाशिव सुतार सर होते. उपस्थितांचे स्वागत या कार्यक्रमाचे संयोजक व कोषाध्यक्ष श्री. विकासदादा काकडे यांनी केले
ज्येष्ठ पत्रकार श्री.नरेश गुजराथी यांनी वर्तमानपत्रे व माध्यमांचे बदलते स्वरूप,दैनिके व साप्ताहिकांच्या खपाचे घटते प्रमाण या विषयावर आपली मते मांडली व वाचकवर्ग दिवसेंदिवस अन्य पर्यायी मार्गाचा कसा वापर करू लागलेत याविषयी मते मांडली तर सौ. प्रिया निकुंभ- परदेशी यांनी माध्यमांचे बदलते स्वरूप,न वाचणारा समाज, शाळातील गुणवत्तापूर्ण शिक्षणात मराठी भाषेला प्राधान्य नसणे, मोबाईल, गुगलसारखी सोपी माहिती पुरवणारी साधने इ.बद्दल उहापोह करीत चर्चेत सहभाग घेत मते नोंदविली.
संघाचे उपाध्यक्ष डॉ. रविन्द्र सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना पुस्तकांपर्यंत नेण्यासाठी ‘वाचन कट्टा’ शाळाशाळांतून आकारास यायला हवा असे मत मांडले व संस्थेने वाचनकट्टा उपक्रम सुरु करून शाळेतील विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घ्यावे असे सुचविले. त्यांनी
‘ गंमत कुल्फीची’ हि लघूकथा निर्मिती प्रक्रिया यावेळी सांगितली.
साहित्य संघाचे कोषाध्यक्ष विकासदादा काकडे,कार्यवाहक अमोल खरे,युवाकवी शांताराम वाघ,प्रभाकर डंके सर,सौ.मंदोदरी पाटील, सौ. विनया काकडे, सुरेंद्र भुजंग आदिंनी पाऊस, कवितेचा साज, जगण्यातील गंभीर प्रश्न,आई आदी विषयांवर आपापल्या कविता सादर करून या कार्यक्रमाची रंगत वाढविली. तर डॉ.जे.वाय. इंगळे सर,डी.टी.पवार सर,संघाचे सचिव जनार्दन देवरे यांनी आपल्या वाचनाच्या सवयींबाबत माहिती दिली. लासलगाव येथील कवी दिगंबर देवढे यांच्या ‘नांगराचा घाव’ या काव्यसंग्रहाचा परीचय करून देत त्या काव्यसंग्रहाततील दोन कविता श्री.देवरे यांनी सादर केल्या.
विद्यार्थ्यांसाठी लवकरच पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून यामुळे वाचनसंस्कृती वाढविण्याचे संघाचे उद्दिष्ट पूर्णत्वाकडे जाईल असे मत अध्यक्ष साहित्यिक सदाशिव सुतार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून मांडले. याप्रसंगी त्यांनी आपले निवडक ‘हायकू’ ही सादर केले.
साहित्य- कुतूहल या कार्यक्रमापूर्वी मनमाड साहित्य संघाची मासिक बैठक ही संपन्न झाली व मराठी भाषा संवर्धन, वाचनसंस्कार रुजविणे यावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
सचिव श्री.जनार्दन देवरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले व आभार मानले.

