
नांदगाव | (प्रतिनिधी)
नांदगाव–चाळीसगाव मार्गावरील नस्तनपूर रेल्वे फाटक परिसरात मंगळवारी सायंकाळी झालेल्या भीषण बस–दुचाकी अपघातात दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेमुळे माणिकपुंज परिसरात शोककळा पसरली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, माणिकपुंज (ता. नांदगाव) येथील रमेश विनायक कोल्हे (वय ३५) व सुनील सोपान गोराने (वय ३२) हे दोघे शेतीची कामे आटोपून एमएच-४१ बीबी-०५८४ क्रमांकाच्या दुचाकीवरून गावाकडे परतत होते. सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास नांदगाव–चाळीसगाव रस्त्यावरील नस्तनपूर रेल्वे फाटक परिसरात चाळीसगावकडे जाणाऱ्या भरधाव लक्झरी बसने (एमपी-४४ झेडबी-८८१८) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
या भीषण अपघातात दोघेही बसच्या चाकाखाली सापडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली. घटनेची माहिती मिळताच नांदगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.
या प्रकरणी लक्झरी बस चालकाविरुद्ध नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
मृतांच्या निधनामुळे माणिकपुंज गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

