
‘माझा परिसर, माझी जबाबदारी’ संकल्पनेतून स्वच्छता अभियान; आरोग्य, रक्तदान व सुरक्षिततेच्या उपक्रमांचे आयोजन
सिन्नर 🙁 प्रतिनिधी ) गणेशोत्सव म्हणजे केवळ भक्ती आणि उत्सव नव्हे, तर सामाजिक बांधिलकी जपण्याचीही संधी आहे, हा संदेश देत सिद्धेश्वर नगर मित्र मंडळाच्या वतीने यंदाचा गणेशोत्सव विविध सामाजिक, आरोग्यविषयक, जनजागृती व मनोरंजनात्मक उपक्रमांनी साजरा करण्यात येत आहे. ‘माझा परिसर, माझी जबाबदारी’ या संकल्पनेतून उत्सवाला सामाजिक कार्याची जोड देण्यात आली आहे.
गणेशोत्सवाच्या निमित्ताने सिद्धेश्वर नगर परिसरात सार्वजनिक स्वच्छता अभियान राबविण्यात आले.

या अभियानाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विशेष म्हणजे प्रभागाच्या नगरसेविका सौ. ललिता हांडे यांनी सकाळी हातात झाडू घेत नागरिक व मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत प्रत्यक्ष स्वच्छता मोहिमेत सहभागी होत सामाजिक बांधिलकीचा आदर्श निर्माण केला.या स्वच्छता अभियानासाठी रंजना खालकर, मालती गुजराथी, रुषाली गीते, अलका गुडघे, राजलक्ष्मी खेताडे, स्वाती अनवत, राजेंद्र क्षत्रिय, प्रतीक खालकर, रोहित घुले, ओमकार घुले, रुद्र खेताडे व अथर्व खालकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या योगदानाचे मंडळाच्या वतीने कौतुक करण्यात आले.

गणेशोत्सवाच्या काळात दररोज सायंकाळच्या आरतीनंतर एक तास विविध मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन करण्यात येत असून, लहान मुले, महिला तसेच पुरुष नागरिक उत्साहाने सहभागी होत आहेत. त्यामुळे परिसरात भक्तीबरोबरच आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
आगामी काळात मंडळाच्या वतीने आयुर्वेदिक मार्गदर्शन, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर तसेच सुरक्षिततेबाबत जनजागृती व प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक जाणीव, आरोग्य जागृती, स्वच्छता आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग वाढविण्याचा मंडळाचा प्रयत्न आहे.‘स्वच्छ सिद्धेश्वर नगर — सुंदर सिद्धेश्वर नगर’ आणि ‘माझा परिसर, माझी जबाबदारी!’ या संदेशातून सिद्धेश्वर नगर मित्र मंडळाने यंदाच्या गणेशोत्सवाला सामाजिक उपक्रमांची विधायक दिशा दिली आहे.


