
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : बालगोपाळ सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, अभ्युदय नगरच्या ‘गणराज’ मंडळाचे यंदा ६८वे वर्ष आहे. अभ्युदय नगरचा गणराज यंदा सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक सचिन मोरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘गज महल’मध्ये विराजमान झाला आहे. गणराजाची मूर्ती सुप्रसिद्ध मूर्तिकार राजन झाड यांनी साकारली आहे. मंडळाच्या वतीने यंदाही उत्सवाच्या कालावधीत वर्गणीदार विभागातील रहिवाशांच्या शुभहस्ते गणराजाची महाआरती करण्यात येणार आहे.
शुक्रवार, दिनांक १८/०९/२०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता स्वामी समर्थ गुरुपीठ, दिंडोरी यांच्या माध्यमातून अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दिनांक १९/०९/२०२६ रोजी विभागीय वर्गणीदारांसाठी चित्रकला आणि हस्ताक्षर स्पर्धा घेण्यात येणार आहे. रविवार, दिनांक २०/०९/२०२६ रोजी सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
मंगळवार, दिनांक २२/०९/२०२६ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ४.०० वाजेपर्यंत गणराज सभागृहात युनिकेअर हेल्थ केअर यांच्या माध्यमातून विभागातील नागरिकांसाठी संपूर्ण आरोग्य तपासणी व आयुर्वेदिक उपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
शुक्रवार, दिनांक २५/०९/२०२६ रोजी दुपारी १.०० वाजता अभ्युदय नगरच्या गणराजाची भव्य विसर्जन मिरवणूक काढण्यात येणार आहे. मंडळ गेली ६७ वर्षे अभ्युदय नगर विभागात कला, क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक क्षेत्रांत कार्यरत आहे. गणेशोत्सवाव्यतिरिक्त वर्षभर विविध लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. त्यात रक्तदान शिबिर, मोफत नेत्रचिकित्सा व मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिरांचा समावेश आहे. दिवाळीत आदिवासी पाड्यांतील बांधवांना जीवनावश्यक वस्तू व मिठाईचे, तसेच लहान मुलांना शैक्षणिक साहित्य व खाऊचे वाटप केले जाते.
मंडळाचे अध्यक्ष संतोष आमडोस्कर, सरचिटणीस शैलेश सकपाळ, खजिनदार गोविंद नाईक आणि कार्याध्यक्ष प्रसाद खोडदे आहेत. अंतर्गत हिशोब तपासणीस रिखिल पोरवाल असून विश्वस्त म्हणून मंगेश नागांवकर, सचिन फाळके, मनिष साळकर, मयुर दिवेकर आणि अनिल आगरे कार्यरत आहेत. मंडळाच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक उपक्रमांना नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

