
नांदगाव (प्रतिनिधी)
भारत निवडणूक आयोगाच्या विशेष संक्षिप्त मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत नांदगाव विधानसभा मतदारसंघात ,दि. ,१०,११,१२ जुलै २०२६ रोजी सर्व मतदान केंद्रांवर विशेष मतदार नोंदणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. मतदारांनी या शिबिरांचा लाभ घेऊन आपल्या मतदार यादीतील माहितीची पडताळणी करून आवश्यक दुरुस्ती व नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
नांदगाव विधानसभा मतदारसंघात एकूण ३४१ मतदान केंद्रांवर ही शिबिरे भरविण्यात येणार असून प्रत्येक केंद्रावर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) उपस्थित राहणार आहेत. या कामासाठी स्वस्त धान्य दुकानदार, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका, पोलीस पाटील तसेच काही ठिकाणी शिक्षकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.
या विशेष शिबिरांमध्ये नवीन मतदार नोंदणी, नावातील दुरुस्ती, पत्ता बदल, छायाचित्र अथवा इतर तपशीलांमध्ये आवश्यक सुधारणा करण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. तसेच मतदारांना स्वतः अर्ज भरता येत नसल्यास BLO यांच्याकडून आवश्यक मार्गदर्शन व मदतही केली जाणार आहे.
दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक किंवा स्वतः शिबिरात उपस्थित राहणे शक्य नसलेल्या मतदारांना आवश्यकतेनुसार घरी भेट देऊनही मदत केली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
मतदारांनी आपल्या मतदार ओळखपत्रातील सर्व तपशील तपासून आवश्यक बदल करून मतदार यादी अद्ययावत ठेवण्यासाठी या विशेष मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहन तहसीलदार सुनील सौदाणे व सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी, नांदगाव विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे.

