
नाशिकरोड:( प्रतिनिधी)- प्रत्येकाच्या आयुष्यात येणारा वाढदिवस हा अधिक आनंददायी असतो आणि तो आपण विविध उपक्रमांनी साजरा करतो. मात्र आपल्या कंपनीच्या अधिकारी व्यक्तीचा वाढदिवस कंपनीच्या कर्मचारी वर्गाने अनोख्या पद्धतीने साजरा करताना गरजूंना शैक्षणिक साहित्याची मदत करत शालेय विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवत साजरा केला.
(पळसे येथील नासाका कार्यस्थळावरील माध्यमिक विद्यालयाच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी नासाकाचे अवसायक प्रदीप आव्हाड, नाशिक सर्व सेवाभावी ट्रस्टचे मानद व्यवस्थापक सुधाकर गोडसे आणि मुख्याध्यापक अरुण पगार यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या ‘दातृत्वाचा ज्ञानयज्ञ’ उपक्रमात डीएसआर इंडिया या कंपनीच्या माध्यमातून कंपनीचे बिझनेस हेड दिलीप राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सुमारे १२५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची भेट दिली.
डीएसआर इंडिया कंपनीच्या अधिकारी चैताली पानसरे, जयदीप हपाणी, कर्मचारी कृष्णा खरात, करण पाटील आणि मल्हार पानसरे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तू वाटप करण्यात आल्या. चैताली पानसरे यांनी शालेय जीवनात यशस्वी व्हायचे असेल तर सर्व प्रकारच्या संकटांवर मात करून स्वतःचा ज्ञानमार्ग मातापिता आणि गुरुजन यांच्या संस्कारातून फुलवायचा असतो, अशा प्रकारचे गौरवोदगार काढत डीएसआर इंडियाच्या माध्यमातून पुढील काळात गरजू विद्यार्थ्यांसाठी अधिकाधिक मदत देण्याचे आश्वासन दिले. कंपनीचे अधिकारी दिलीप राणे यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थितांनी फळांचा अनोखा केक कापून वाढदिवस साजरा करत त्यांना शुभेच्छा दिल्या. पंचक्रोशीतील पूनम सांगळे यांची मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला.
आदिवासी भागातील गरजू विद्यार्थ्यांना सातत्याने मदत करणाऱ्या आनंद सहवास संस्थेचे अध्यक्ष किरण सोनार, सदस्य अंजली उगले यांच्या सहयोगाने संपन्न झालेल्या या उपक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मालुंजकर यांनी केले.

