
समाजातील वाढत्या भोंदूगिरीला
पायबंद घालण्यासाठी विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित होणे अत्यंत आवश्यक आहे, त्यासाठी शिक्षक, पालक यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत,असे प्रतिपादन महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. ठकसेन गोराणे यांनी केले.

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या चांदवड येथील मातोश्री जिजाबाई रघुनाथराव गुंजाळ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर सप्रयोग व्याख्यान देताना ते बोलत होते.
डॉ. गोराणे पुढे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेत प्रत्येक भारतीय नागरिकाचे मूलभूत कर्तव्य म्हणून त्याने स्वतःमधील विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद, शोधक बुद्धी व सुधारणावाद यांचा विकास करणे, असे नमूद आहे. तसेच महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेतही एक महत्वाचे नीतिमूल्य म्हणून ते समाविष्ट आहे. म्हणून विद्यार्थ्यांनी स्वतः मधील वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित करण्यासाठी प्रत्येक घटनेचे जाणीवपूर्वक सूक्ष्म निरीक्षण करून तर्क, अनुमान, प्रचिती, प्रयोग या पायर्यांनुसार सत्यशोधनाचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी सतत प्रश्न विचारले पाहिजेत.

यावेळी त्यांनी पाण्यावर दिवा पेटवणे , अंधश्रद्धेची बेडी सोडवणे, माझी श्रद्धा माझ्या हाती, गोडबाबा, दैवी शक्तीने वस्तू ओळखणे अशी विविध चमत्कार सदृश्य प्रात्यक्षिके सादर करून त्या मागील कार्यकारणभाव स्पष्ट केला.
सुरुवातीला विद्यालयाचे प्राचार्य संजय लोहकरे यांनी प्रास्ताविकात अंधश्रद्धा निर्मूलनाची गरज विशद केली. विद्यार्थ्यांनी कोणत्याही कारणास्तव कोणत्याही भोंदू बाबाकडे जाऊ नये, असे त्यांनी निक्षून सांगितले.
सप्रयोग व्याख्यानासाठी महाराष्ट्र अंनिसचे चांदवड येथील ज्येष्ठ मार्गदर्शक डॉ. राजेंद्र मलोसे, कार्यकर्ते समर्थ केदारे, हर्षदा शिंदे तसेच विद्यालयातील इयत्ता पाचवी ते बारावीचे जवळपास पाचशे विद्यार्थी -विद्यार्थीनी आणि शिक्षक- शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

