लेखक – प्रा.जावेद शेख,सिन्नर
– पुस्तक – गोंदेश्वर मंदिर दर्शन
83298 39434

▫️सिन्नरची सुप्रसिद्ध बारादारी माहीत आहे का?
▫️तिला बारादारी का म्हणतात जाणून घ्यायचे आहे ??
▫️बारादारीला स्वामी दयानंद महाराज मठ सुद्धा म्हणतात.का म्हणतात जाणून घ्यायचे आहे का???
▫️बारादारीच्या ऐतिहासिक संकुलातील समाधी स्थळे जाणून घ्यायची आहे ????
▫️अंधार बारव व चाफे बारव कुठे आहे समजून घ्यायचे आहे का?????
▫️चाफे बारव वरील शिलालेख कोणती ऐतिहासिक माहिती सांगत आहे,जाणून घ्यायचे आहे??????
तर ऐतिहासिक,आध्यात्मिक महत्व सांगणारा दीर्घ असला तरी खालील लेख अवश्य वाचा ..
सिन्नर म्हटले की सर्वप्रथम आठवते ते यादवकालीन गोंदेश्वर मंदिर. परंतु या ऐतिहासिक नगरीत असे एक वारसा-संकुल आहे, ज्याकडे आजही अपेक्षित गांभीर्याने पाहिले जात नाही. सरस्वती नदीच्या शांत तीरावर वसलेली बारादारी ही केवळ एक वास्तू नसून धर्म, परंपरा, स्मृती आणि स्थापत्य वारशाला एकत्र गुंफणारे एक सांस्कृतिक केंद्र आहे.
बारादरी परिसरात धर्म,अध्यात्म आणि इतिहासाचे अनेक पदर एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतात. म्हणूनच या परिसराकडे केवळ एका वास्तूप्रमाणे नव्हे, तर “सिन्नरचा बहुआयामी वारसा परिसर” म्हणून पाहण्याची गरज आहे.
बारादारी
बारादारी म्हणजे बारा कमानी,बारा दरवाजे अथवा बारा उघड्या दालनांचा मंडप होय. मध्ययुगीन काळात अशा वास्तूंचा उपयोग राजेशाही विरंगुळा,विश्रांती,सभा,न्यायनिवाडा,धार्मिक-सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रशासकीय कार्यासाठी होत असे. सिन्नरची बारादारी सुद्धा त्याच परंपरेची साक्ष देणारी एक महत्वपूर्ण वास्तू आहे.बारादारी परिसर हा सरस्वती नदीच्या काठी वसलेला आहे. नदीकाठामुळे येथे धार्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाची समृद्ध परंपरा विकसित झाली. आजही हा परिसर सिन्नरच्या धार्मिक,ऐतिहासिक स्मृती जपणारा महत्त्वाचा भाग आहे.
🔹बारादारी
सिन्नर नगरीच्या ऐतिहासिक खुणा या आधुनिक काळात ही जपणारे ठिकाण म्हणजे बारादारी होय.सिन्नर शहराच्या नाशिकवेसच्या सरस्वती नदीच्या काठावर जवळपास तीन एकराच्या परिसरात पसरलेला आहे. पूर्वी नाशिक वेशीतून पाऊलवाटेने गेल्यावर मोठ-मोठी लिंबाची झाडे,कडुलिंबाचे वन, चिंचांची झाडे व अनेक गर्द झाडांनी व्यापलेला परिसर लागला म्हणजे बारादारी जवळ पोहचलो असे समजायचे.
बारादारीत पोहचल्यावर समोरच दुमजली श्री सत्यनारायण मंदिर नजरेस पडते. या मंदिरालगतच दयानंद महाराजांची समाधी आहे. त्यामुळे बारादारीला दयानंद महाराजांचा मठ म्हणूनही ओळख मिळाली आहे. या मंदिराच्या दक्षिण बाजूला सिन्नरच्या १२ ज्योतिर्लिंगांपैकी असणारे एक ऐतिहासिक ब्रह्मेश्वर महादेवाचे प्राचीन मंदिर आहे. श्री नारायण मंदिराच्या उत्तर बाजूला घडीव दगडांनी बांधलेली.
मोगल सरदार महाबत खान १६९१ नंतर मराठा सत्तेवर चाल करून आल्यानंतर त्याने काही काळ या ठिकाणी वास्तव्य होते.या काळात राणीच्या विरुंगळ्यासाठी सरस्वती नदीवर १२ कमानीचा बाग बांधली होती परंतु नंतर कल्याणची सुभेदारी मिळाल्यानंतर त्याला कल्याणला निघायचे होते परंतु राणीला सदर ठिकाण सोडून जाण्याची इच्छा नव्हती.अशा वेळेस सदर बांधलेले बारादारी त्याने नष्ट करविला अशी कथा या ठिकाणी प्रचलित आहे परंतु त्याचे कुठल्याही स्वरूपाचे पुरावे अजून तरी आढळलेले नाही.परंतु आजही बारादारीच्या उरलेल्या भिंती ह्या भाजलेल्या विटांच्या बनविलेल्या होत्या व त्यावर सांधण्यासाठी चुन्याचा वापर केलेला होता याचा खुणा दिसून येतात.पूर्वी बारादारीच्या भिंतींना गेरु रंग वापरलेला असून त्यावर पांढ-या रंगाने चौफुला, षटकोनी, अष्टकोनी, चौकटयुक्त, फुलाकृती, वेलबुट्टीदार असे शोभायमान नक्षीकाम भिंतीवर काढलेले होते.बारादारीच्या तळमजल्यात एक मोठा हौद होता व या ठिकाणी कारंजे असावेत असा कयास लावता येतो. या हौदात कारंज्यांच्या खुणाही पहायला मिळतात. ठिकठिकाणी कारंजे असावेत असे दिसून येते. सुशोभीकरण करताना आज येथे दिसणारे भग्न अवशेष पाहता बारादारीची ही वास्तू किती प्रशस्त,भव्य असेल याची कल्पना येते.सरदार,राजे,राणी यांचे तत्कालीन विश्रांती स्थान किती वैभवशाली व निसर्गरम्य असेल हे पाहिल्यावर सहज लक्षात येते.
🔸स्वामी श्री दयानंद महाराज मठ🔸
श्री दयानंद महाराज हे मुळचे काशी येथले परंतु सिन्नर नगरीत सन १९०० च्या दरम्यान त्यांचे या परिसरात आगमन झाले होते,आले असे सांगितले जते.स्वामी दयानंद महाराज जवळपास अनेक वर्षे नागेश्वरी मंदिर परिसरात वास्तव्यास होते. महाराजांची ख्याती व सिद्धी जाणल्यावर सिन्नर नगरीतील अनेक प्रतिष्ठित नागरिक त्यांचे शिष्य झाले. त्याकाळी महाराजांवर श्रद्धा असणारे भाऊसाहेब देशमुख हे त्यांचे शिष्य होते. त्यांनी दयानंद महाराजांना बारादारी येथे राहण्याची विनंती केली आणि अंधेरी बारव शेजारी त्यांची राहण्याची सोय केली. पुढे त्या जागेवर महाराजांवर श्रद्धा असणारे सखाराम तुकाराम गंगावणे यांनी दयानंद बाबांसाठी सत्यनारायण मठ व मंदिर बांधून दिला.सदर मठाची व मंदिराची व्यवस्था सिन्नरकर मनोभावे करत असत.दयानंद स्वामींनी आपल्या बारादारी वास्तव्यात देवाच्या नावाने अनेकदा भंडारे केले व त्यासाठी सिन्नरकर त्यावेळी आवर्जून उपस्थित राहत व त्यात सक्रिय सहभाग घेत असत .श्री दयानंद बाबांच्या सान्निध्यात आल्यावर असाध्य रोग बरे होत असत,ही श्रद्धा असल्यामुळे गावात त्यांच्याविषयी लोकांत अतिशय आदर प्रेम व कृतज्ञता भाव होता.अनेक वर्षांचा वास्तव्यकाळ साधना, तपश्चर्या व लोकसेवेसाठी अर्पण केल्यानंतर दयानंद महाराजांनी दिनांक १८ ऑगस्ट १९०७ रोजी नारायण मंदिराच्या शेजारी बाबांनी समाधी घेतली.आजही दयानंद बाबांच्या समाधीचे सिन्नरकर मनोभावे दर्शन घेऊन पूजाअर्चा करत असतात.
श्री दयानंद बाबांसारख्या तपस्वी,योगीचे दीर्घकाळ वास्तव्य व समाधीमुळे बारादारी श्री दयानंद बाबा मठ म्हणून सुपरचित झाले आहे.
सरस्वती नदीचा काठ व पवित्र परिसर असल्यामुळे आज या ठिकाणी दशक्रिया व अनेक धार्मिक विधी होतात.भाविक व सिन्नरकरांच्या सोयीसाठी परिसरात दोन नवीन सभामंडप उभे राहिलेले दिसून येतात.
🔹ब्रह्मेश्वर मंदिर🔹
बारादरी परिसरातील ब्रह्मेश्वर मंदिर हे प्राचीन शैव उपासनेचे केंद्र आहे. सिन्नर नगरीतील १२ ज्योतिर्लिंगांपैकी सदर एक महत्वाचे स्थान आहे.या मंदिराची रचना, स्थापत्य आणि धार्मिक परंपरा या सिन्नरच्या सांस्कृतिक इतिहासाचा अविभाज्य भाग आहेत.
🔸सत्यनारायण मंदिर🔸
ब्रह्मेश्वर मंदिराबरोबरच नारायण मंदिर वैष्णव परंपरेचे प्रतिनिधित्व करते. शैव आणि वैष्णव उपासनेचा सुंदर संगम या परिसरात पाहायला मिळतो.सदर मंदिर दोन मजली असून मंदिराच्या दक्षिण दिशेला दयानंद बाबा यांच्या बैठकीचे स्थान, पादुका,त्रिशूळ आणि यज्ञकुंड आहे.त्यामुळे बारादरी परिसर धार्मिक सहअस्तित्वाचे उत्कृष्ट उदाहरण ठरतो.
🚩सरदार अमृतराव देशमुख यांची स्मृती समाधी🚩
सिन्नरच्या इतिहासात देशमुख घराण्याचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. सरदार अमृतराव देशमुख यांनी शहराच्या विकासात आणि स्थानिक प्रशासनात बजावलेली भूमिका विशेष उल्लेखनीय मानली जाते. बारादरी परिसरातील त्यांच्याशी संबंधित स्मृती या सिन्नरच्या राजकीय इतिहासाचा महत्त्वाचा दुवा आहेत.
🚩राजे कुंवरसिंग,राजे फतेसिंग आणि राणीच्या स्मृती समाध्या🚩
या परिसरातील राजे कुवरसिंग,चौदा चौकाचा वाडा प्रशस्त बांधणारे,इतिहासातील सुप्रसिद सरदार राजे फतेसिंग यांच्या स्मृती समाधी आहे.शेजारी राजे फतेसिंग यांच्या निधनानंतर सती गेलेली त्यांची पत्नी राणी राजाबाई यांची सुद्धा स्मृती स्थळ असून तिथेच आपणास सतीचा अग्निकुंड बांधलेला दिसून येतो.राजवंश परंपरेतले थोर राजे आणि राणीच्या समाध्या मराठाकालीन स्मृतिस्थापत्याचा महत्त्वपूर्ण वारसा आहेत. समाधी वास्तू तत्कालीन स्थापत्यकलेची आणि स्मृती जपण्याच्या परंपरेची साक्ष देतात.
🍃🔳चाफे पाय बारव🔳🍃
समाधी स्थानांच्या पूर्वेस लागूनच एक मोठी पायबारव आहे. पूर्वी या बारवेवर पाणी उपसण्यासाठी हत्तींच्या मोटा चालत असत अशी लोककथा सांगितली जाते. या बारवेच्या पाय-यांनी आतमध्ये उतरताना समोर असलेल्या भिंतीवर एक दगडी शिलालेख कोरण्यात आलेला आहे. सिन्नर नगरीत उपलब्ध असलेला वावी वेशीवरील शिलालेखानंतर हा दुसराच शिलालेख येथे दिसून येतो जो आज काळाच्या ओघात झिजलेला आहे
सदर शिलालेखातील मजकूर खालील प्रमाणे वाचता येतो.
☾ श्री ○
।। राजे कुव
।। र बाहादर
।। शके १६४८
श्री अक्षराच्या पूर्व बाजूला सूर्य तर पश्चिम बाजूला चंद्रकोर यांची चित्रे कोरण्यात आलेले आहेत. शके १६४८ म्हणजेच ही बारव सुमारे सन १७२६ च्या दरम्यान बांधलेली आहे. राजे कुंवर बहादर यांनी सदर बारव बांधली आहे हे या शिलालेखावरून निश्चित होते. राजे कुंवर बहादूर यांचा वास्तव काळही आपणास कळतो. याच चाफे बारवेतून चौदाचौक वाड्यात पाण्याचा पुरवठा होत असे अशी एक लोककथा सांगितली जाते.
🔳अंधेरी बारव🔳
नारायण मंदिराला लागूनच उत्तरेला सदर बारव आहे.या बारवेच्या पाय-यांनी खाली उतरुन गेल्यावर पूर्वाभिमुख शेंदूर ल्यालेली गणेश मूर्ती कोनाड्यात ठेवलेली दिसून येते. अंधेरी बारवेस वर्षभर भरपूर पाणी असते व आजही सदर बारावेच्या पाण्याचा वापर विविध धार्मिक कार्यासाठी केला जातो.
परिसरातील दोन प्राचीन बारवा त्या काळातील जलव्यवस्थापन, स्थापत्य कौशल्य आणि लोकजीवनाचे महत्त्वपूर्ण उदाहरण आहेत. पाणी साठवण आणि सार्वजनिक उपयोगासाठी उभारलेल्या या बारवा आज ऐतिहासिक जलसंस्कृतीची साक्ष देत उभ्या आहेत.परंतु आज सदर बारव अगदी दुर्लक्षित व अस्वच्छ झालेले दिसून येतात.
🔹मियां बडे मालिक बाबा देवस्थान🔹
बारादरी परिसरातील उत्तर बाजूला मियां बडे मालिक हे देवस्थान असून हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जातो. विविध समाजातील भाविक येथे श्रद्धेने भेट देतात. सिन्नरच्या सामाजिक सलोख्याचे हे एक जिवंत प्रतीक आहे.सर्वधर्मीयांचे श्रद्धास्थान असणाऱ्या बाबाचा मोठा संदल उत्सव आणि भंडारा नाशिकवेशीतील नागरिकांकडून आजही भक्तिभावाने केला जातो.
🔸लोककथा व आख्यायिका🔸
बारादारी हा परिसर पूर्वी पासून सिन्नर नगरी पासून अंतरावर घनदाट अशा वनराईत सरस्वती नदीच्या काठाजवळ असल्यामुळे या परिसरासंदर्भात पूर्वीपासूनच सिन्नरकरांना कुतूहल व भीतीसदृश्य आस्था असलेली दिसून येते.बारादारी येथे असणारे हौदेतील व विहिरीतील भुयार मार्ग चौदा चौकाच्या फत्तेसिंग वाड्यात व एक भुयार थेट गोंदेश्वर मंदिराच्या प्रांगणात निघतो अशा प्रकारची एक आख्यायिका आवर्जून जाणत्या लोकांकडून सांगितली जाते.दुर्दैवाने सदर हौद व विहारी पूर्ण बुजल्या गेल्यामुळे व काळाच्या ओघात त्या नष्ट झाल्यामुळे आता सदर भुयारांचा शोध घेणे अशक्यप्राय गोष्ट आहे.
बारादारीला असणारे चिंच वन,घनदाट झाडी व गूढ वलय असल्यामुळे भूत – पिशाच्या अनेक सुरस कथा,व्यक्ती अनुभव परिसरात ऐकायला मिळतात.
🔹वारसा संवर्धनाची गरज🔹
इतिहास, अध्यात्म, स्थापत्य, समाधी, मठ, मंदिरे, दर्गा आणि जलव्यवस्थापन अशा अनेक वारसांचा संगम असलेला बारादरी परिसर हा सिन्नरच्या ओळखीचा अविभाज्य भाग आहे. या संपूर्ण परिसराचे वैज्ञानिक सर्वेक्षण, पुरातत्त्वीय नोंदणी, माहितीफलक, संवर्धन आणि वारसा पर्यटनाच्या दृष्टीने नियोजन होणे ही काळाची गरज आहे.
गोंदेश्वर मंदिराप्रमाणेच बारादरी परिसराचाही अभ्यास, जतन आणि प्रचार झाला तर सिन्नरच्या इतिहासातील अनेक अज्ञात पाने उजेडात येतील. हा परिसर भविष्यात संशोधक, विद्यार्थी आणि इतिहासप्रेमींसाठी एक महत्त्वपूर्ण अभ्यासकेंद्र ठरू शकतो.
बारादरी ही केवळ एक वास्तू नाही; ती सिन्नरच्या अनेक शतकांच्या इतिहासाची, श्रद्धेची, सामाजिक सलोख्याची आणि सांस्कृतिक सातत्याची जिवंत साक्ष आहे.
– लेखक – प्रा.जावेद शेख,सिन्नर
– पुस्तक – गोंदेश्वर मंदिर दर्शन
83298 39434

