

नाशिक:- ( प्रतिनिधी ) योगाचार्य अशोक पाटील यांच्या ‘आत्मशोध’ या काव्यसंग्रहात बहुविविधता पाहायला मिळते. संग्रहातील कविता स्वान्तसुखाय जशी आहे; तशी ती परजनहितायही आहे. या कवितासंग्रहातील कवितांमध्ये जीवनानुभवांचे प्रतिबिंब दिसून येते, असे प्रतिपादन माजी आमदार नानासाहेब बोरस्ते यांनी केले.
गंजमाळ येथील रोटरी सभागृहात गिरणादूत प्रकाशन प्रकाशित आणि योगाचार्य अशोक पाटील लिखीत ‘आत्मशोध’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन महामंडलेश्वर श्री १००८ शिवानंद महाराज यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री.बोरस्ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष सावळीराम तिदमे, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.भगीरथ शिंदे, प्रा.श्रीकांत सोनवणे, गिरणा गौरव प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेश पवार आणि कवी योगाचार्य अशोक पाटील मंचावर उपस्थित होते.
श्री.बोरस्ते पुढे म्हणाले की, कवी अशोक पाटील यांचे बालपण कृषी संस्कृतीत रुजलेलं आहे. शिक्षण खेड्यासह शहरात झालेले आहे. ते नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने नाशिक शहरात राहिले. योगाभ्यासात रमता-रमता त्यांनी काव्यक्षेत्रही पादाक्रांत केले. या काव्यसंग्रहात बहुविविधता पाहायला मिळते. कवीच्या आयुष्यात घडलेल्या घटनांचे दर्शन या कवितेत दिसून येते, असेही ते म्हणाले.
शिवानंद महाराज यांनी आपल्या भाषणात ‘आत्मशोध’ या शीर्षकावर वैचारिक भाष्य करताना कवितेतल्या आत्मशोधाबरोबरच जीवनाच्या स्वरूपाचा शोध घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. अध्यक्षीय भाषणात सावळीराम तिदमे यांनी चिरंतन साहित्याची निर्मिती होणे आवश्यक आहे. देहमंदिराला योग्य दिशा मिळाली पाहिजे. माणसाने कृतिशील विचार करायला हवा, यासाठी हा आत्मशोध असल्याचे विचार मांडले. ॲड.भगीरथ शिंदे, प्रा.श्रीकांत सोनवणे, प्रकाशक सुरेश पवार यांच्यासह योगाचार्य अशोक पाटील यांनी आपल्या मनोगतात संग्रहातील दोन कविता सादर केल्या. कार्यक्रमात योगक्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या प्रसाद कुलकर्णी, मनोहर कानडे, डॉ.योगेश कुलकर्णी, राधिका धिवरे, प्रा.वंदना रकिबे, अश्विनी पाटील यांना योगतज्ज्ञ मणिभाई देसाई योगदूत पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तनिष्का पाटील हिने ‘फुलराणी’ नाटकातील प्रवेश सादर केला. विभूती पाटील हिने कविता सादर केली. डॉ.तस्मीना शेख यांनी स्वागतगीत सादर केले. प्राचार्य राजेश्वर शेळके यांनी प्रास्ताविक केले. योगेश पाटील यांनी आभार मानले. कवी रवींद्र मालुंजकर यांनी सूत्रसंचालन केले.

