
नाशिक:(प्रतिनिधी)- आत्महत्या केलेल्या परिवारातील विधवा शेतकरी महिलांचे प्रश्न आजही तसेच आहेत. आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिलांचे आणि परिवाराचे दुःख मांडताना वास्तव प्रकर्षाने समोर आले, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार आणि दिव्य मराठीच्या निवासी संपादक दीप्ती राऊत यांनी केले.
गिरणा गौरव प्रतिष्ठानच्या वतीने हुतात्मा स्मारकात आयोजित ‘पुस्तकावर बोलू काही’ उपक्रमात २८७वे पुष्प गुंफताना ‘कोरडं शेत ओले डोळे’ या पुस्तकावर त्या ऐसपैस गप्पा करत होत्या. अध्यक्षस्थानी माजी आ. नानासाहेब बोरस्ते होते.
दीप्ती राऊत पुढे म्हणाल्या की, महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रश्न भेडसावत आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनापासून तर निवडणुकांच्या राजकारणापर्यंत हा विषय आजही तसाच धगधगता आहे. या परिवारातील शेतकरी विधवांची होणारी होरपळतआणि दुःखाला जिद्दीने सामोरं जाऊन लढणाऱ्या महिलांची अनेक उदाहरणं जगासमोर आणणारे हे पुस्तक आहे. रोजचीच लढाई हरणाऱ्या शेकडो महिला आज परिस्थितीपुढे हातबल झाल्या आहेत. अंधारमय भविष्याचे भय असणाऱ्या महिला अंधारात चाचपडत आहेत. हा एक सामाजिक प्रश्न असून डोक्याचा पदर कमरेला खोचून जगण्याची लढाई जिंकणाऱ्या भगिनींची व्यथा पुस्तकात मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ग्रामीण भागातील रूढी व परंपरा यांनी जखडलेल्या वातावरणात पतीच्या नैसर्गिक मृत्यूलाही पत्नीलाच दोषी ठरवून आयुष्यभर दुःख देणाऱ्या आणि ते दुःख सहन करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या अनेक महिलांच्या अंतरंगाचा वेध घेत अनेक संकटांना तोंड देत फाशीचा दोर किंवा कीटकनाशकाची बाटली तोंडाला लावण्याऐवजी मुलाबाळांच्या भविष्याचा विचार करणाऱ्या अनेक विधवा महिलांचा मागोवा या पुस्तकातून घेता आला. आत्महत्याग्रस्त शेतकरी विधवा महिलांसाठी
शेतीशाळा सुरू करायला पाहिजे, असेही त्या म्हणाल्या.
ज्येष्ठ कवी एकनाथ वाघ आणि प्राचार्य अनंत वाणी यांना ग्रंथभेट देण्यात आली. श्रीकांत बेणी यांनी आभार मानले. सुरेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. दरम्यान येत्या शुक्रवारी (२४) सुनील पगार ‘गदलं’ या पुस्तकावर ऐसपैस गप्पा करणार आहेत.

